ठाणे : लांजा राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. तीन वेळा लांजा राजापूर मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजकारणात मन मोठं असावं लागतं, पण मला एक पुरस्कार काय मिळाला आणि यांची जळफळाट सुरू झाली. शरद पवारांनी राज्याची संस्कृती दाखवली, पण उद्धव ठाकरेंनी विकृती दाखवली, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले की, शरद पवार यांच्यावर अविश्वास दाखवणे हे दुर्दैव आहे. पवार साहेब परिपकव नेतृत्व आहे. एक पुरस्कार दिला तर एवढा जळफळाट व्हायचं कारण काय? राजकारणात मोठं मन हवं. आपण कमरेखाली कधीही वार केले नाहीत, कोणाबद्दल वाईट कधी बोललो नाही. महादजी शिंदे यांचा अपमान काही लोकांनी केला, साहित्यिकाचा अपमान केला. ज्यांना शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री केलं त्यांनीच हा अपमान केला. शरद पवार यांनी राजकारणापलीकडे काम केलं आहे. पवार साहेब यांनी राज्याची संकृती दाखवली, तर या माणसांनी विकृती दाखवली. ही त्यांची खेकडा वृत्ती आहे, ही पोटदुखी आहे. हे कंपाउंडरकडून औषध घेतात. पोटदुखी थांबण्यासाठी चांगल्या डॉक्टरकडून औषध घ्या, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. पुढे म्हणाले, घरात बसून काम होत नाही, हे शरद पवार यांनी सुद्धा आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी आणि मी काय काम केलं याची माहिती शरद पवारांनाही आहे. दिल्लीसमोर गुडघे टेकणार नाही म्हणायचे आणि आता दिल्लीत काय करताय? असा सवाल देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. तळमळीने काम करणारा सच्चा सहकारी गमावला : उपमुख्यमंत्री अजित पवार विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मुर्तीजापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनाने विदर्भाचा कर्तृत्ववान सुपुत्र, चळवळीत काम करणारा सच्चा कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझा सहकारी हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात, माजी आमदार तुकाराम बिडकर हे महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेले, विदर्भाच्या विकासासाठी कार्यशील असलेले नेतृत्वं होते. तीन महिन्यापूर्वी झालेल्या अपघातातून ते नुकतेच सावरले होते. शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला सुध्दा ते उपस्थित होते. मात्र पुन्हा एकदा अपघातानेच त्यांचा बळी घेतला, ही घटना अत्यंत क्लेशकारक आहे. त्यांचं अकाली निधन हा राष्ट्रवादी परिवारासाठी मोठा धक्का आहे, अशा शोकभावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.