शहांवरील खोट्या आरोपांबद्दल शरद पवार यांनी माफी मागावी; पियूष गोयल यांची मागणी

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले. त्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते पियूष गोयल यांनी केली. पवार यांनी शहांवर केलेल्या टीकेचा समाचार गोयल यांनी पत्रकार परिषदेत घेतला. केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचे सरकार असताना शहा आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कारस्थान रचण्यात आले.
केंद्रातील त्या सरकारमधील पवार हे महत्वाचे घटक होते. त्या सरकारने शहांविरोधात खोटे प्रकरण दाखल केले. शहांची लोकप्रियता वाढत असल्याने आणि यूपीए पुढील निवडणुकीत पराभूत होणार असल्याची जाणीव झाल्याने त्यांना गोवण्यात आले. मोदी आणि शहा यांना लक्ष्य करून पराभवापासून वाचवण्याचा प्रयत्न केला गेला.
शहा यांच्या विरोधातील प्रकरण पूर्णपणे निराधार आणि खोट होते. त्यामधून सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मुक्तता केली. त्या आदेशामुळे यूपीए, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कारस्थान उघड झाले, असे ते म्हणाले.





