Sharad Pawar : हमास-इस्त्रायल बाबत शरद पवारांचे मोठे विधान; मोदी सरकारवर साधला निशाणा

Sharad Pawar – हमास-इस्त्रायल युद्धाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य त्यांच्या नेतृत्वाखालील परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केलेल्या विधानापेक्षा भिन्न स्वरूपाचे आहे असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.
पवार म्हणाले की भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की भारत नेहमीच पॅलेस्टाईनच्या बाजूने राहिला आहे आणि आम्ही त्याच भूमिकेवर ठाम आहोत. पण पंतप्रधान मोदींनी मात्र आम्ही इस्त्रायच्या पुर्ण बाजूने आहोत असे म्हटले आहे.
इस्रायल-पॅलेस्टाईन समस्या “गंभीर आणि संवेदनशील” आहे आणि अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती आणि इतर मुस्लीम देशांच्या विचारांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
गंभीर आंतरराष्ट्रीय विषयावर देशाच्या प्रमुखाने एक आणि त्यांचे परराष्ट्र मंत्रालयाने वेगळीच भूमिका घेण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे पवार म्हणाले. ते आज येथे पत्रकारांशी बोलत होते.
रविवारी, हमासने इस्त्रायलमध्ये हल्ला केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रायलला पाठिंबा व्यक्त केला होता आणि “दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केला होता. इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्यांच्या वृत्ताने आपल्याला खूप धक्का बसला,
या कठीण प्रसंगी इस्रायलसोबत एकजुटीने उभे राहा, असे आवाहनही मोदींनी केले होते. तथापि भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकारांशी बोलताना वेगळीच भूमिका मांडली होती.





