“शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली कारण…; संजय राऊतांनी भेटीविषयी दिली माहिती

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेटली घेतली. सोमवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये चर्चा पार पडली. दरम्यान यावेळी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यासंबंधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे. मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटणार आहेत त्यासंबंधी यावेळी चर्चा झाली,” असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ मागताच पंतप्रधानांनी तात्काळ दिली असून या बैठकीत तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
“महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याला मराठा आरक्षणाचा विषय ताणला जाऊ नये असे वाटत आहे. मराठा, ओबीसी असे अनेक विषय असून प्रत्येकाने आपल्या प्रश्नासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रात वातावरण गढूळ होईल, तणाव निर्माण होईल,” अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
“महाराष्ट्र करोनाशी लढत असून हा सर्व विषय केंद्राच्या अख्त्यारित आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मराठा आऱक्षण विषय केंद्राच्या अख्त्यारित गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन इतक्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करुन केंद्र सरकाच्या दरबारात प्रश्न मांडणं कर्तव्य आहे. हा गंभीर विषय असून मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्यातून तात्काळ मार्ग काढा आणि मराठा समजााल न्याय द्या सांगण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण दिल्लीत पोहोचले आहेत. मोदींना ते ठामपणे सांगतील,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.





