Pune MPSC Protest: पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांमध्ये फूट! एकाच वेळी ३ ठिकाणी स्वतंत्र आंदोलने; रस्त्यावर भयंकर गोंधळ
Pune MPSC Protest: एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा अन् परीक्षा पद्धतीतील बदलावरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दोन गट; शहरात ३ वेगवेगळ्या ठिकाणी ठिय्या आंदोलन.

Pune MPSC Protest- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारावरून आणि परीक्षा पद्धतीवरून शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी फूट पडली आहे. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मूळ मागणीवरून सुरू झालेल्या या लढ्याला आता वेगळेच वळण मिळाले असून शहरातील तीन वेगवेगळ्या प्रमुख ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतंत्र आंदोलने पुकारली आहेत. एका बाजूला राजकीय पाठिंबा असलेली आंदोलन, तर दुसरीकडे वर्णनात्मक पद्धतीला समर्थन, तर तिसऱ्या गटाकडून वर्णनात्मक पद्धतीला विरोध आणि बहुपर्यायी परीक्षा पद्धतीचा आग्रह आहे.
एस. एम. जोशी पूलावर विद्यार्थ्यांची गर्दी
एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता आणणे आणि अध्यक्षांचा राजीनामा या मागणीसाठी एस.एम. जोशी पुलावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पहिले आंदोलन सुरू आहे. ७० हजार पदांची तातडीने मेगाभरती करावी, एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाइन घेण्यात याव्यात, गैरव्यवहारांची एसआयटीद्वारे निष्पक्ष चौकशी व्हावी आणि राजस्थानच्या धर्तीवर अवघ्या १०० रुपयांच्या कार्डवर वर्षभरातील सर्व परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या या गटाने लावून धरल्या आहेत.

एमपीएससीच्या मेन डिस्क्रीप्शन पॅटर्न सरकारने तसाच कायम ठेवावा त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन टिळक चौक केळकर रस्त्यावर विद्यार्थी बसले आहेत.
टिळक चौकातही आंदोलन
दुसरीकडे, परीक्षा पद्धतीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचे दोन गट थेट आमनेसामने आले आहेत. टिळक चौकात विद्यार्थ्यांनी नवीन वर्णनात्मक परीक्षा पद्धतीच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. परीक्षा पद्धतीतील बदल गर्दीच्या दबावाखाली न होता तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसारच व्हावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. वर्णनात्मक पद्धत कायम ठेवावी, तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार निर्णय घ्यावा, परीक्षा व निकालाचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करून त्याचे काटेकोर पालन करावे, पेपर तपासणीसाठी पारदर्शक मानक कार्यपद्धती लागू करावी, अशी मागणी या गटाने केली आहे.
लालबहादूर शास्त्री रस्त्यावर आंदोलन
लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील अहिल्या अभ्यासिकेसमोर विद्यार्थ्यांनी वस्तुनिष्ठ (बहुपर्यायी) पद्धतीच्या समर्थनार्थ आंदोलन छेडले आहे. आयोगाकडे वर्णनात्मक परीक्षा पद्धती राबवण्याची पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याचा दावा करत, ९० टक्के विद्यार्थ्यांचा कौल बहुपर्यायी पद्धतीकडेच असल्याचा दावा या गटाने केला आहे. तसेच, बहुपर्यायी परीक्षा पद्धत २०२७ पासून लागू करावी, अशी अट या विद्यार्थ्यांनी ठेवली आहे.
आंदोलनाचा वाहतुकीस अडथळा
आंदोलन करणे हा लोकशाहीचा अधिकार आहे. मात्र, त्यासाठी नागरिकांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा ठिकाणी रस्ता बंद ठेवणे कितपत योग्य आहे. सध्या, आंदोलनामुळे एस.एम.जोशी पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने रुग्णालयातील रुग्णवाहिका, वैकुंठाकडे जाणारे नागरिक, वृद्धाश्रम, सभागृह आणि पत्रकार भवनाकडे जाणाऱ्यांना मोठा वळसा घ्यावा लागत आहे. आंदोलनासाठी पर्यायी जागा देऊन नागरिकांसाठी वाहतुकीस पूल खुला करावा, अशी मागणी काही नागरिकांकडून होत आहे.





