Sharad Pawar – संधी मिळाली तर कोठल्याही क्षेत्रात जाऊन सोने करण्याची महिलांची क्षमता आहे. त्या कुठेही पुरुषांपेक्षा कमी नाहीत, याचा अनुभव मी वेळोवेळी घेतला आहे. म्हणूनच राज्य कारभार असो की प्रशासन, साहित्य, कला, संस्कृती आणि लष्करातही महिलांची कामगिरी ही देशाला अभिमान वाटावी अशीच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ११ आणि १२ एप्रिल २०२६ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्याच मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे अनावरण पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, अनुज नहार, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, लक्ष्मीकांत खाबिया उपस्थित होते. या संकेतस्थळावर दिल्लीत संमेलनसंदर्भात होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. आज देशात छत्रपती घराण्याचा मोठा सन्मान आहे. त्याच घराण्याच्या छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सरहद संस्थेच्या पुढाकाराने होणारे हे शासकीय, तसेच प्रशासकीय महिलांचे साहित्य संमेलन पुढच्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल, असे पवार यांनी नमूद केले. महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षणाचे बिल येणार आहे. या संधीची सुरुवात मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातून केली. हे धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे, याचा मला अभिमान वाटतो. म्हणूनच या शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातून होणारे विचारमंथन समाज आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, असेही पवार म्हणाले.