शरद पवारांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी दिवाळी सरंजाम वाटप; संदीप बालवडकरांच्या उपक्रमाचे कौतुक

पुणे : राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने संदीप बालवडकर यांनी आयोजित केलेला दिवाळी सरंजाम वाटप सोहळा कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे मराठवाड्यातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांसह सर्वसामान्यांची दिवाळी गोड होईल, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केल्या.
बालेवाडीतील साई चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) पुणे शहराचे उपाध्यक्ष संदीप धारूजी बालवडकर आणि त्यांच्या पत्नी सुषमा बालवडकर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडला. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी शरदचंद्र पवार यांनी बालेवाडी परिसराच्या विकासाच्या आठवणींना उजाळा दिला. स्थानिक राजकारणी आणि बालवडकर, चौधरी, मुरकुटे या मंडळींनी जमिनी देण्याची तयारी दाखवली, त्यामुळेच भव्य बालेवाडी स्टेडियम उभारता आले. त्या निमित्ताने बालेवाडीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आणि अनेक खेळाडू घडले. सहकार्याची भावना ठेवल्यामुळे हे शक्य झाले, असे पवार म्हणाले.
आजही आपल्या शेतकरी बांधवांना आधाराची गरज आहे. हीच भावना ठेवून संदीप बालवडकर यांनी शेतकऱ्यांची दिवाळी आनंदी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याला सर्वांच्या सहकार्याची साथ लाभत आहे, हे खरोखरच प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार पवार यांनी काढले.
कार्यक्रमात संदीप बालवडकर यांनी या परिसराचा कायापालट केवळ पवारसाहेबांमुळे शक्य झाला. त्यांनी त्याचे श्रेय कधीच घेतले नाही, पण नागरिकांना त्याची जाणीव आहे. त्यांच्या हस्ते सरंजाम वितरण सोहळा पार पडणे हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे, असे सांगत पवारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.





