Sharad Pawar : देवाभाऊ हा मोर्चा फक्त सुरूवात आहे.! शरद पवारांचा थेट इशारा

Sharad Pawar – महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यांत २००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी एवढी टोकाची भूमिका घेत आहेत याचे कारण शेतकऱ्यांच्या संटकाच्या काळात मार्ग काढण्याची जबाबदारी सरकार घेत नाही, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत, शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आज नाशिकचा हा मोर्चा फक्त सुरूवात आहे. ही सुरूवात येथेच थांबणार नाही. असा इशारा ही त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिक येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात या वर्षी अतिवृष्टी झालेली आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांवरती झाला आहे. संकट येत असतात. त्यावर मार्ग काढायचा असतो. ही जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची असते. मात्र, शेतकऱ्यांकडे पाहायला आजच्या राज्यकर्त्यांना वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
आज नाशिकचा कांदा जगात जातो. कांदा विकून दोन पैसे मिळतील. ज्यामुळे मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण करता येईल. मात्र, केंद्र सरकारने निर्यात बंदी केली आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे.आज कांद्याला दर नाही.
कांदा निर्यात करा, त्यामुळे दर वाढतील. केंद्र सरकार कांदा निर्यात करत नाही. मग शेतकऱ्यांनी करायचे तरी काय? यावर उत्तर शोधायचे असेल तर या सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
देवाभाऊ तुम्ही सर्व महाराष्ट्रात तुमचे फोटो लावून छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याचे तुम्ही देशाला दाखवले. मात्र, देवाभाऊ शेतकऱ्यांकडे पाहायला तयार नाहीत.
देवाभाऊंना माझी विनंती आहे की जरा आजूबाजूला पाहा. काय घडतेय? आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाहीत. पण सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असेल तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.





