Satara Loksabha: साताऱ्यात ‘मविआ’चा उमेदवार ठरला, ‘या’ वजनदार नेत्याला उमेदवारी

Satara Lok sabha Election 2024 – सातारा लोकसभा मतदारसंघासाठी अखेर महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहे. शरद पवार गटाकडून येथे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) असतील हे निश्चित मानले जात आहे. उदयनराजेंनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, अजुनही उदयनराजे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सातारा लोकसभेसाठी 7 मेला मतदान होणार आहे.
शशिकांत शिंदे 15 एप्रिलला भरणार अर्ज –
प्राथमिक माहितीनुसार, शशिकांत शिंदे हे येत्या 15 तारखेला 11 ते 2 या वेळेत सातारा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरतील अशी देखील माहिती समोर आली आहे. शरद पवार गटाकडून मंगळवारी मुंबईतील महाविकास आघाडीच्या संयुक्त परिषदेत साताऱ्यासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघ हा गेली अनेक वर्षे भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील हे साताऱ्याचे विद्यमान खासदार आहेत. मात्र, यंदा त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणुकीला उभे राहण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे साताऱ्यात कोणाला उभे करायचे, हा प्रश्न शरद पवार गटासमोर होता.
शरद पवार यांच्याकडून मध्यंतरीच्या काळात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर तुतारीच्या चिन्हावर साताऱ्यातून लढण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारीच्या चिन्हावर लढण्यास नकार दिला होता. त्यामुळे शरद पवार साताऱ्यातून कोणाला रिंगणात उतरवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येत आहे.
शशिकांत शिंदे सातारा जिल्ह्यातील वजनदार नेते –
शशिकांत शिंदे सातारा जिल्ह्यातील वजनदार नेते आहेत. माथाडी कामगारांचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी जावळी आणि कोरेगाव या दोन विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. या दोन्ही तालुक्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे शशिकांत शिंदे आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण करतील. उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यात साताऱ्यात थेट लढत पहायला मिळणार आहे.





