Sharad Pawar : ‘शरद पवारांनी विश्वासघात केला’; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याची टीका

मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कारानंतर उबाठा गट चांगलाच आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या कर्यक्रमावरून सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली होती. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत हेदेखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले विनायक राऊत?
मंगळवारी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना विनायक राऊत यांनी शरद पवारांवर मोठा आरोप केला आहे. ‘शरद पवार साहेबांनी गद्दार आणि बेईमान व्यक्तीचा सन्मान केला आहे. यावर जे संजय राऊत साहेब बोलले ते अगदी बरोबर आहे. राऊत साहेब सत्य आहे ते बोलले आहेत. शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवला होता, पण विश्वासघात झाला, असं राऊत साहेबांनी म्हटलं आहे’ असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते राजन साळवी हे पक्षाला रामराम करणार असल्याची माहिती समोर येत होती. अखेर आज राजन साळवी यांनी पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ते उद्या, गुरुवारी दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्यार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
राजन साळवी हे मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. परंतु, अलीकडच्या काळात विनायक राऊत यांच्याशी झालेल्या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू उचलून धरल्यामुळे साळवी दुखावले गेले होते. कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे याचा मोठा फटका ठाकरेसेनेला बसणार आहे.





