मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. एकीकडे प्रशासनाकडून आरक्षण सोडती जाहीर होत आहेत, तर दुसरीकडे राजकीय पक्षांच्या रणनीती आणि युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या आज (१३ ऑक्टोबर) झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत पक्षप्रमुख शरद पवार यांनी एक मोठी घोषणा केली. आगामी निवडणुकांसाठी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या ५० टक्के तरुणांना उमेदवारी देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यामुळे पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल आणि संघटना मजबूत होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या मुंबईतील या बैठकीत शरद पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांची रणनीती सांगितली. जास्तीत जास्त तरुणांना संधी कशी द्यायची, यावर प्रयत्न करा. पक्षात नवे चेहरे आणून संघटना तरुणाईने भरून काढा, असे निर्देश देताना त्यांनी स्पष्ट केले की, निवडणूक उमेदवारांपैकी ५० टक्के राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या युवक-युवतींना प्राधान्य मिळेल. ही घोषणा पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी महत्त्वाची असल्याचे सांगत पवार म्हणाले, आमच्याकडे इच्छुकांची संख्या खूप आहे, काम करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. अल्पसंख्याक समाजाच्या प्रमाणे युवक-युवतींनाही आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. या फॉर्म्युल्यामुळे पक्षातील जुन्या नेत्यांना बाजूला सारून नव्या पिढीला वाव मिळेल, अशी अपेक्षा आहे. शरद पवार यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या (१४ ऑक्टोबर) बैठक होणार असून, ती युतीच्या शक्यतांवर प्रकाश टाकेल. “येत्या आठवडाभरात स्थानिक पातळीवर युतीबाबत निर्णय घ्या. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात समन्वय साधा, असे सूचना देण्यात आल्या. मात्र, युतीचा अंतिम निर्णय मविआच्या सर्व नेत्यांच्या सहमतीने घेतला जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी अजित पवार गटातील आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदवला. पूर्वी आपल्या पक्षात असलेले एक आमदार आता जाती-जातीत तणाव निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत. हे चुकीचे आहे. जातीय सलोखा राखा, बोलताना प्रेमाची भाषा वापरा. विधानांमुळे दरी निर्माण होऊ नये,” असे पवार म्हणाले. पुढे बोलताना म्हणाले, महाराष्ट्राची राजकीय परंपरा जाती-धर्मावर नसून, लोककल्याणावर आधारित आहे, असे अधोरेखित करत ते म्हणाले, “वाचाळवीर वाढले आहेत. कोणी कोणाकडून काय खरेदी करावे, यावर सरकार गप्प बसते का? सरकारचा पाठिंबा आहे का? अशा विधानांमुळे सामाजिक सलोखा बिघडतो.” अतिवृष्टीग्रस्तांसाठी सरकारची मदत अपुरी बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरही शरद पवार यांनी भाष्य केले. राज्य सरकारची अतिवृष्टी मदत “तुटपूंजी” असल्याचे सांगत ते म्हणाले, “केंद्रीय पथकाने येऊन पाहणी केली पाहिजे होती. आमच्या काळात केंद्रीय पथक पाहणी करून भरघोस मदत देत असे. नरसिंह राव जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा ते अतिवृष्टी पाहण्यासाठी येणार होते. मीच त्यांना ‘येऊ नका’ असे म्हटले, कारण शासकीय यंत्रणा दौऱ्यासाठी लागेल आणि मदत उशिरा होईल.” या विधानाने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले असून, पक्षाने अतिवृष्टीग्रस्त भागात मोर्चा काढण्याची योजना आखली आहे.