नेवासा नगरपंचायतच्या निष्क्रियतेविरोधात चेंबरच्या खड्ड्यावर झोपून अनोखे आंदोलन

नेवासा : नेवासा शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील उघड्या चेंबरवर पडलेल्या खड्ड्याकडे नगरपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके यांनी बुधवारी अनोखे जन आक्रोश आंदोलन केले. खड्ड्यावर झोपून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या खड्ड्यामुळे अनेक नागरिक जखमी झाले असून, याबाबत गायके यांनी यापूर्वी नगरपंचायतीला निवेदने देऊन सूचित केले होते. मात्र, प्रशासनाच्या रामभरोसे कारभारामुळे कोणतीही कारवाई झाली नाही.
गायके यांनी यापूर्वीही शहरातील विविध समस्यांसाठी आगळेवेगळी आंदोलने करून प्रशासनाला जागृत केले आहे. या खड्ड्यामुळे लहान मुले, महिला व नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी त्यांनी नगरपंचायतीला खड्ड्यांची दुरुस्ती करून चेंबरवर झाकणे बसवण्याची मागणी केली.
प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत संताप व्यक्त करताना, गायके यांनी नागरिक व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. या आंदोलनामुळे नगरपंचायत प्रशासन जागे होऊन नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष देईल का, असा सवाल नेवासा शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत.





