Newasa News : नेवासा नगरपंचायत निवडणुकीत तीव्र चुरस; ‘लक्ष्मी’चा प्रभाव चर्चेचा विषय

राजेंद्र वाघमारे/नेवासे : नेवासे नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शेवटपर्यंत जोरदार सुरू होती. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या सर्व पक्षीय उमेदवारांनी शहर पिंजून काढत मतदारांची मनधरणी केली. महायुतीचे शिवसेना (शिंदे गट) उमेदवार डॉ. करणसिंह घुले यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात जाहीर सभा घेतली. त्यांनी “पाहिजे तो निधी देऊ, नगरविकास खाते माझ्याकडे आहे” असे सांगत धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या नेवासे शहराच्या विकासासाठी डॉ. घुले यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
दुसरीकडे, क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार आणि दिग्गज नेते नंदकुमार पाटील यांच्या प्रचाराची धुरा माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या समर्थकांनी सांभाळली. त्यांनी थेट मतदारांशी संपर्क साधून प्रचार केला.
नगराध्यक्षपदासाठी एकूण ६ उमेदवार रिंगणात होते:
– डॉ. करणसिंह घुले (महायुती – शिवसेना)
– नंदकुमार पाटील (क्रांतीकारी शेतकरी पक्ष)
– सचिन कडू (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट)
– आल्ताफ पठाण (काँग्रेस)
– ॲड. दिनकर घोरपडे (अपक्ष)
– अशपाक शेख (अपक्ष)
खरी चुरस ही डॉ. करणसिंह घुले आणि नंदकुमार पाटील यांच्यातच होती. इतर उमेदवार, विशेषतः आल्ताफ पठाण आणि सचिन कडू यांना किती मते मिळतील आणि ते कोणाचे मते विभागतील, यावर विजयाचे गणित अवलंबून होते.
प्रचारात उमेदवारांच्या योग्यता आणि शहर विकासाच्या मुद्द्यांपेक्षा पैशाचा प्रभाव (मतदारांना पैसे देणे) जास्त चर्चिला गेला. अनेक मतदारांनी “लक्ष्मी आवतरल्याशिवाय” मतदान न करण्याचा फंडा अवलंबला. पाच वर्षांत नेते मतदारांना विचारत नाहीत, कामाची वेळ आली तरी लक्ष देत नाहीत, असा आरोप करत मतदारांनी पैशाच्या जोरावरच मतदान केल्याचे चित्र दिसले. यामुळे प्रभागनिहाय नियोजन, मतदारांना दिलेली “रसद” आणि “ताकद” यावरच विजय अवलंबून राहिला.
शहरातील चौकाचौकात चर्चेच्या मैफिली रंगल्या. कोणाची हवा आहे, कोण चांगला विकास करेल यापेक्षा कोणाचे “वजन” भारी यावर मतदारांची भिस्त होती. आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, निकालाचा फैसला लवकरच उघड होईल.
पैशाच्या प्रभावाने अनेक अंदाज फोल
या निवडणुकीत अनेक मतदारांनी “लक्ष्मी” (पैसे) आवतरल्याशिवाय पवित्र मतदानाचा हक्क बजावला नाही. पाच वर्षे कोणी विचारत नाही, कामाची वेळ आली तरी नेते लक्ष देत नाहीत, असा फंडा अनेकांनी अवलंबला. कोण चांगला उमेदवार आहे यापेक्षा त्याची “लक्ष्मी” किती भारी यावर मतदारांनी स्वारी केली. यामुळे अनेकांच्या अंदाजांना दातखिळ्या बसल्या.





