प्रभात वृत्तसेवा नेवासे – नेवासे नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या धामधूमीत शहरातील दहा माजी नगरसेवक शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गळाला लागले असून,आणखी माजी नगरसेवक हे शिंदे गटात प्रवेश करून धनुष्यबाण चिन्हावर नेवासे नगरपंचायत निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहे.राज्यात शिवसेना पक्षाची दोन शकले झाल्यापासून अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत आहे. आता नेवासे शहरातही लवकरच हे दहा नगरसेवक आमदार विठ्ठलराव लंघे पाटील आणि शिवसेनेचे नेते प्रभाकर (काका) शिंदे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली धनुष्यबाण हाती घेणार आहे.नेवासे नगरपंचायतीची निवडणूक लवकरच होणार असल्यामुळे शहरातील ‘त्या’ दहा माजी नगरसेवकांमध्ये वारंवार प्रचंड अस्वस्थता वाढत चाललेली दिसून येत आहे. लवकरच आता हे दहा नगरसेवक धनुष्यबाण हाती घेण्याचा एकमुखी निर्णय घेऊन आणखी काही नगरसेवकही लवकरच शिंदे सेनेच्या गळाला लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हे दहा नगरसेवक धनुष्यबाण हाती घेऊन पुन्हा एकदा नगरपंचायत निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याची चर्चा शहरात जोरदारपणे सुरू झालेली आहे. नेवासे शहरात नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागात इच्छुकांचा मोठा भरणा असल्यामुळे आता आपली खुर्ची पक्की करण्यासाठी शहरातील ‘त्या’ दहा माजी नगरसेवकांनी धनुष्यबाण हाती घेण्याचा आपला इरदा पक्का केलेला आहे. कोपरगावच्यासभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: मी नेवासे शहरात येणार असल्याचे सांगितलेले होते. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांसह अन्य पदाधिकारी हे आता लवकर शिवसेनेत प्रवेश करणार आहे.