शनिवारवाड्याला “गतवैभव’; दिवाळी सुट्या, वीकेंडमुळे पर्यटकांच्या पुन्हा रांगा

पुणे – पुण्याचे ऐतिहासिक वैभव असणारा शनिवारवाडा पाहण्यासाठी पर्यटकांची पुन्हा रीघ लागली आहे. दिवाळी सुट्या आणि जोडून वीकेंड असल्याने शनिवारवाडा पाहण्यासाठी गर्दी झाल्याचे रविवारी दिसून आले.
करोनामुळे पर्यटनावरील बंधने शिथिल झाली आहेत. त्यातच दिवाळीची सुट्टी असल्याने शहर तसेच लगतची पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांनी बहरत आहेत. शहाराच्या केंद्रस्थानी असलेले आणि जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारा शनिवारवाडा हे नेहमीच पर्यटकांचे आकर्षण ठरते.
वाड्यामधील विविध वास्तू, बाग, जुने अवशेष, उंचच उंच दरवाजे हे वाड्याच्या इतिहासाची आठवण करून देतात. दिवाळीनिमित्त पुण्यात येणारे नागरिक आवर्जून शनिवारवाड्याला भेट देतात. तर पुस्तकात वाचलेला शनिवारवाडा प्रत्यक्षात दिसतो कसा?
हे पाहण्याबाबत बालचमूंमध्ये कुतुहल असल्याने पालकही आनंदाने आपल्या मुलांना शनिवारवाडा पाहण्यासाठी घेऊन येतात. रविवारीदेखील शनिवारवाडा पाहण्यासाठी
अशाप्रकारे विविध वयोगटातील नागरिकांची गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. शनिवारवाडा पाहण्यासोबतच वाड्याच्या प्रांगणात उभे राहून, तरुण-तरुणींसह कुटुंबीय सेल्फी, फोटो घेत होते. तर बच्चेकंपनी वाड्याचा फेरफटका मारत होते.
नियम पाळण्याची गरज –
शनिवारवाडा आणि परिसरात सध्या पर्यटकांची गर्दी दिसत आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचे संकट पाहता, नागरिकांनी सुरक्षा नियम पाळण्याची आवश्यकता आहे. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियम सर्वांनीच पाळले, तर करोना संसर्ग रोखला जाऊ शकतो.





