अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी राहुरी-शनीशिंगणापूर मार्गावर उंबरे गावाच्या हद्दीत तांबे पेट्रोल पंपाजवळ अत्यंत भीषण रस्ता अपघात घडला. शनीशिंगणापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने समोरून येणाऱ्या ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की रिक्षा अक्षरशः उडाली आणि टेम्पो ट्रॅव्हलरही रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या दुर्घटनेत रिक्षामधील ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, टेम्पो ट्रॅव्हलरमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, शनीशिंगणापूरकडे जाणारा भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर राहुरीकडून येणाऱ्या रिक्षावर आदळला. धडक इतकी जोरदार होती की रिक्षा अक्षरशः उडाली. रिक्षामध्ये बसलेले पाच प्रवासी गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र अधिकृत आकडेवारी आणि ओळख पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना रिक्षा आणि टेम्पोमधून बाहेर काढून रुग्णवाहिकांच्या मदतीने राहुरी आणि अहमदनगर येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले. अपघातामुळे शनीशिंगणापूर रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. राहुरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भरधाव वेग हा मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शनीशिंगणापूरला जाणाऱ्या भाविकांचा हा प्रमुख मार्ग असून, येथे अपघातांची संख्या सतत वाढत आहे. रस्त्याची खराब अवस्था, वाहनचालकांचा बेफिकीरपणा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे अपघात होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. स्थानिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीला आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. पोलिस आणि प्रशासनाकडून अपघातप्रवण भागात कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.