पाच लाखांहून अधिक भाविक शनिचरणी नतमस्तक!

सोनई (वार्ताहर) – शनी अमावस्या, श्रावणातील शेवटचा शनिवार व रविवारची सुटी सलग आल्याने पाच लाखांहून अधिक भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. रात्री 12 वाजता पुणे येथील राहुल गोडसे, महेंद्र पारडे, पहाटे संभाजीनगर येथील माजी खा. चंद्रकांत खैरे, दिल्लीचे मेहतानी, ऑस्ट्रेेलियाचे राकेश कुमार, दुपारी मुंबईचे शनिभक्त सौरभ बोरा, झिम्बाब्वेचे जयेश शहा, आदर्श गाव हिवरेबाजारचे पोपट पवार यांच्या हस्ते विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. सायंकाळी ओरिसाचे शनिभक्त नब किशोर दस यांच्या हस्ते आरती होऊन संकल्प केलेला सतरा लाखांचा कलश शनिदेवाला अर्पण करण्यात आला. ( shani shingnapur )
शनिअमावस्येनिमित्त शुक्रवार (दि. 26) रात्रीपासूनच भाविकांची गर्दी वाढत जाऊन शनिवारी दिवसभर प्रचंड गर्दी झाली होती. दिवसभर ढगाळ वातावरण, उन्हामुळे उकाडा जाणवत होता. दुपारी भाविकांची गर्दी रोडावली. शनी चौथर्याच्या काही अंतरावर दर्शनरांगेत विनामास्क भाविकांनी गर्दी केली होती. शनिअमावस्येनिमित्त प्रवेशद्वार, मंदिर परिसर, शनिचौथरा येथे विद्युत रोषणाई, आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. ठिकठिकाणी भाविकांना शनिभक्तांकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दिवसभरात सुरतचे ओरिसाचे शनिभक्त नबकिशोरी दस, आ. जनक पटेल, आ. प्रफुल्ल पनशेरिया, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आ. भाऊसाहेब कांबळे, युवा नेते उदय गडाख यांच्यासह अनेक मान्यवरांनी विधिवत पूजा करून शनिदर्शन घेतले. भाजपचे गुजरातहून आलेले आ. जनक पटेल व आ. प्रफुल्ल पनशेरिया यांचे भाजपचे नेवासा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, ओबीसी तालुकाध्यक्ष देविदास साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी स्वागत केले.
राज्याच्या कानाकोपर्यातून पाच लाखांहून अधिक भाविक आल्याचे देवस्थानतर्फे सांगण्यात आले. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, विकास बानकर, पोपट शेटे, आप्पासाहेब शेटे, अॅड. सयाराम बानकर, बाळासाहेब बोरुडे, आप्पा कुर्हाट, कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. विशेष अतिथीचा सन्मान कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले व उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे करत होते.
प्रसादासाठी भाविकांची रेलचेल ( shani shingnapur )
भाविकांना शनिप्रसाद बर्फी नेण्यासाठी नियोजन नसल्याने अक्षरशः प्रसाद स्टॉलवर भाविकांना रेलचेल करावी लागत होती. काही अंतरावरून पायी यावे लागल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.





