नेवासा : जगप्रसिद्ध श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर येथे भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन पूजा साहित्याच्या नावाने होणारी लूट थांबवण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त तथा देवस्थानाचे प्रशासक डॉ. प्रवीण गेडाम यांनी कंबर कसली आहे. नुकतेच देवस्थानाचा कारभार हाती घेतल्यानंतर डॉ. गेडाम यांनी प्रथमच मंदिर परिसरातील पूजा साहित्य विक्रेत्यांवर लक्ष केंद्रित केले. भेस बदलून स्वतः दुकानांना भेटी देऊन त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला असता, विक्रेत्यांनी त्यांनाच ११०० रुपयांना पूजा साहित्य विकण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. या प्रकाराने संतापलेल्या डॉ. गेडाम यांनी पूजा साहित्य दुकानांच्या दर्शनी भागात दरफलक लावणे अनिवार्य करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गैरकारभाराची पार्श्वभूमी जगप्रसिद्ध शनी शिंगणापूर देवस्थानाची ख्याती विश्वभर पसरलेली असतानाही, गेल्या काही वर्षांत गैरकारभारामुळे ते चर्चेत आले आहे. देवस्थानाच्या आर्थिक अनियमिततेच्या चौकशीदरम्यान काही पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले होते. यानंतर देवस्थानचा कारभार कधी विश्वस्त मंडळाकडे, कधी सरकारच्या नियुक्त प्रशासकाकडे जात होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची देवस्थानाच्या प्रशासकपदी नियुक्ती झाली. डॉ. गेडाम यांनी कारभार हाती घेताच देवस्थानाच्या श्रद्धेची ख्याती अबाधित ठेवण्यासाठी आणि गैरकारभारावर अंकुश ठेवण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. मंदिर परिसरात पूजा साहित्य विक्रेते भाविकांना अव्वाच्या सव्वा दराने साहित्य विकतात, याची दखल घेऊन त्यांनी स्वतः भेस बदलून फेरफटका मारला. या तपासणीत विक्रेत्यांनी आयुक्तांनाच ११०० रुपयांना पूजा साहित्य विकण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकार उघडकीस आला. यामुळे भाविकांची होणारी लूट थांबवण्यासाठी दुकानांमध्ये दरफलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांतून कौतुकाचा वर्षाव या निर्णयामुळे देवस्थानची प्रतिमा मलीन होण्यापासून वाचणार असून, भाविकांना पारदर्शकता मिळेल. पूजा साहित्य विक्रीतून होणाऱ्या लुटीला आळा बसल्याने भाविकांमध्ये डॉ. प्रवीण गेडाम यांच्याबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे. देवस्थानाच्या गैरकारभारावर अशा प्रकारे वक्रदृष्टी फिरवून सुधारणा घडवून आणण्याचे त्यांचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे भाविकांचे मत आहे. शनी शिंगणापूर देवस्थान आता सरकारच्या अंकुशाखाली असल्याने भाविकांच्या श्रद्धेला न्याय मिळेल आणि देवस्थानाची विश्वासार्हता पुन्हा वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. डॉ. गेडाम यांच्या या हिरारीने भाविकांमध्ये समाधानाची लहर निर्माण झाली आहे.