‘या’ कारणामुळे शमिता शेट्टीने नाकारला “लगान’?

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची छोटी बहीण शमिता शेट्टीने 2000मध्ये प्रदर्शित झालेल्या “मोहब्बतें’ चित्रपटातून सिनेसृष्टीत डेब्यू केले होते. यशराज बॅनर निर्मित या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि ऐश्वर्या रायसह अनेक कलाकारांनी भूमिका साकारली होती. यात शमिता शेट्टी आणि उदय चोपड यांची जोडी झळकली होती.
शमिता शेट्टीने भलेही “मोहब्बतें’मधून धमाकेदार एन्ट्री केली होती, पण खूपच कमी लोकांना माहिती असेल की या चित्रटासाठी शमिताने आमीर खानचा सुपरहिट “लगान’ चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. याबाबत नुकत्याच एका चॅट शोमध्ये शिल्पा शेट्टीने खुलासा केला होता.
शिल्पा म्हणाली, शमिताकडे एकाच वेळी “लगान’ आणि “मोहब्बतें’ या दोन चित्रपटांची ऑफर आली होती. याप्रसंगी शमिता दोन्ही चित्रपट करू शकत नव्हती. यामुळे तिने “मोहब्बतें’ चित्रपटाची निवड केली. यानंतर “लगान’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून ग्रेसी सिंहला कास्ट करण्यात आले.
दरम्यान, शमिताला चित्रपटसृष्टीत म्हणावे तसे यश मिळविता आले नाही. तिने दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये आपले नशिब आजमाविले. तसेच काही वेब सीरिजमध्येही तिने काम केले. याशिवाय “बिग बॉस सीजन-3′, “झलक दिखला जा सीजन-8′ आणि “फीयर फेक्टर खतरों के खिलाडी-9’मध्येही शमिता झळकली होती.





