निमोणे (शिरूर): शिरूर तालुक्यातील करडे गावात रेशन दुकानात रेशन घेण्यासाठी गेलेल्या एका 28 वर्षीय अल्पसंख्याक समाजातील महिलेसोबत दुकानदाराने लज्जास्पद वर्तन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी, 13 जुलै 2025 रोजी दुपारी 12:30 च्या सुमारास घडली. तक्रारदार महिला आपल्या दोन मुलांसह करडे गावातील शिवाजी सदाशिव बांदल यांच्या रेशन दुकानात रेशन घेण्यासाठी गेल्या होत्या. रेशन घेत असताना दुकानदार शिवाजी बांदल याने त्यांच्या पाठीमागून येऊन त्यांना मिठी मारत छेडछाड केली. या अचानक घडलेल्या लज्जास्पद प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केली. त्यावेळी आरोपीने “तू नेहमी रेशन घ्यायला ये, मला पैसे नको,” असे अश्लील बोलून तिचा विनयभंग केला. आरोपीने “जर तू पोलिसांत तक्रार केलीस, तर तुला आणि तुझ्या मुलांना जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी दिली. या घटनेमुळे महिलेला मानसिक धक्का बसल्याने त्या दिवशी तक्रार दाखल झाली नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी, सोमवारी (14 जुलै 2025) शिरूर पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आरोपीविरुद्ध लज्जास्पद वर्तन (विनयभंग) आणि जीवे मारण्याची धमकी या कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.