Shambhuraj Desai : दुखापत होऊनही पायाला भिंगरी बांधलेलीच; शंभूराज देसाई यांची नियोजित कार्यक्रमांसाठी धावपळ
तासगाव येथील गणपतीच्या पारंपरिक रथोत्सवात गर्दीमध्ये राज्याचे पर्यटन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या पायाला दुखापत झाली.

Shambhuraj Desai : तासगाव येथील गणपतीच्या पारंपरिक रथोत्सवात गर्दीमध्ये राज्याचे पर्यटन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या पायाला दुखापत झाली. वेदना वाढत असतानाही नियोजित कार्यक्रम पूर्ण करुन त्यांनी कराड येथे उपचार घेतले आणि विश्रांती न घेता दौलतनगर गाठून रात्री उशिरापर्यंत नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. शंभूराज देसाई यांच्या या धावपळीची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
तासगाव (सांगली) येथील ऐतिहासिक श्री गणपती पंचायतन संस्थानच्या दीड दिवसांच्या पारंपरिक रथोत्सवासाठी देसाई उपस्थित होते. रथोत्सवाच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होती. याच गर्दीत त्यांच्या पायाला दुखापत झाली. वेदना जाणवू लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना (Shambhuraj Desai) दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याचा आणि विश्रांतीचा सल्ला दिला.
मात्र, गणेशोत्सवानिमित्त विविध गणेश मंडळांच्या भेटी पूर्वनियोजित होत्या. आमदार सुहास बाबर यांच्या आग्रहानंतर त्यांनी नियोजित भेटी पूर्ण केल्या. मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी कराड गाठून पायावर उपचार घेतले.
उपचारानंतर विश्रांती घेण्याऐवजी ते दौलतनगरकडे रवाना झाले. मतदारसंघातील नागरिकांच्या पूर्वनियोजित भेटीगाठी असल्याने रात्री उशिरापर्यंत संवाद सुरू राहिला. नागरिकांच्या अडचणी, प्रलंबित कामे आणि विविध स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. दुसऱ्या दिवशीही जनता दरबार आणि नियोजित बैठका पार पडल्या.
नागरिकांचे प्रश्न जाणून घेत संबंधित विभागांशी चर्चा करून विविध कामांचा आढावा घेण्यात आला. गणेशोत्सवातील कार्यक्रम असो किंवा जनता दरबार, नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यावर देसाई (Shambhuraj Desai) यांच्या दौऱ्यात भर राहिला. तासगावमधील दुखापतीनंतर उपचार घेतल्यानंतरही दौरा कायम ठेवण्यात आल्याने या घटनाक्रमाकडे विशेष लक्ष वेधले गेले.






