Shambhuraj Desai : “सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करणार!” शंभूराज देसाईंचा भाजपला थेट इशारा
Shambhuraj Desai : जिल्हा परिषद सभापती निवडीत भाजपचे अडवणूक तंत्र; लोकशाहीचा खून होत असल्याचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा आरोप.

Shambhuraj Desai – जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी फोडाफोडीचे तंत्र भाजपने सुरू केले. जी वेळ आमच्यावर आहे ती त्यांच्यावर सुद्धा येऊ शकते. सुरुवात त्यांनी केली, शेवट नक्कीच आम्ही करणार. जिल्हा परिषदेचे राजकारण संपले नाही तर सुरु झाले आहे. अजून पुलाखालून बरेच पाणी जायचे आहे. ‘आगे आगे देखो होता है क्या’ असे सूचक वक्तव्य करत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपच्या दडपशाही तंत्राचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना पोलीसांनी जाणीवपूर्वक अडथळा आणत सभागृहात पोहोचण्यास विलंब केला.
याचा राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बसून निषेध केला. दंडाला काळ्या फिती लावून त्यांनी आपला विरोध दर्शविला. हे गोंधळ नाट्य पालकमंत्री शंभूराज देसाईं यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर उपस्थित होते. शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेत 20 मार्च रोजी भाजपने दहशतीचे राजकारण केले त्याची विधानसभा, विधान परिषदेसह देश पातळीवर चर्चा झाली.
भाजपबरोबर निवडणूक लढवायची नाही अशा राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना सदस्यांच्या तीव्र भावना आहेत. दोन्ही पक्षांचे आम्ही जेष्ठ सदस्य या नात्याने सर्व सदस्यांच्या या भावना ऐकून घेतल्या. त्यामुळे सर्व सदस्यांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकत दंडाला काळ्या फिती लावून निषेध केला. भाजपच्या या दहशतीच्या राजकारणाविरोधात सभागृहात वेळोवेळी आवाज उठवणार आहे.
त्याचबरोबर पक्षाच्या विरोधात काम केलेल्या शिवसेनेच्या दोन सदस्यांचा अहवाल शिवसेनेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केलाआहे. भाजपने फोडाफोडीचे राजकारण केले ती वेळ त्यांच्यावर सुद्धा येणार आहे. भाजपच्या या राजकारणाला आम्ही तोडीस तोड उत्तर देणार असून अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात आम्ही कायदेशीर दाद मागणार आहोत.’’





