Shambhuraj Desai : जिल्ह्यात केवळ १७ टँकर! पाणीटंचाईवर पालकमंत्र्यांचा मोठा दावा; नक्की काय आहे वस्तुस्थिती?
Shambhuraj Desai : जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा शिल्लक; पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत शेती आणि उद्योगासाठी शंभूराज देसाईंचे नियोजन.
Shambhuraj Desai – उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाही सातारा जिल्ह्यातील पाणीटंचाई परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचा दावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला. जिल्ह्यात सध्या 17 पेक्षा कमी टँकरच्या फेऱ्या सुरू असून उपलब्ध जलसाठ्याच्या आधारे प्रशासन परिस्थिती हाताळत असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी टंचाई आढावा बैठक घेत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. विधानसभा मतदारसंघनिहाय आमदारांनी सादर केलेल्या आराखड्यांना मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात माण, खटाव आणि वाई या तीन तालुक्यांमध्येच सध्या टँकर सुरू आहेत. तर कराड आणि खंडाळा तालुक्यांत विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला आहे. प्रशासनाच्या या उपाययोजनांमुळे टँकरवरील अवलंबित्व मर्यादित राहिल्याचा दावा करण्यात आला.
कोयना धरणासह जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांमध्ये सध्या 55.57 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी केवळ कोयना धरणातच 37.51 टीएमसी इतका साठा असल्याने दिलासा मिळत असल्याचे ना. देसाई यांनी सांगितले. शासनाच्या धोरणानुसार पाण्याचा वापर प्रथम पिण्यासाठी, त्यानंतर शेतीसाठी आणि उर्वरित साठा औद्योगिक वापरासाठी राखून ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
टंचाईचा पालकमंत्र्यांकडून आढावा
टंचाईच्या पार्श्वभूमीवर विंधन विहिरी, टँकर तसेच चारा छावण्यांच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्याचे निर्देश प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष स्थळभेट देऊन त्वरित निर्णय घेण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, पाटण तालुक्यातील कळंबे येथे अदानी उद्योग समूहाचा हायड्रो प्रकल्प उभारला जात असून, पारंपरिक जलस्रोतांवर परिणाम होण्याच्या भीतीने ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बैठक घेऊन ग्रामस्थांची समजूत काढल्याची माहिती देसाई यांनी दिली.
सोमवारी साताऱ्यात शिवसेना शिंदे गटचा मेळावा
याशिवाय, 20 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता साताऱ्यातील गांधी मैदानावर शिवसेना (शिंदे गट) मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कारही होणार आहे. त्याआधी अंगापूर, (ता. कोरेगाव) येथे धार्मिक कार्यक्रमाला उपस्थिती लावून शिंदे साताऱ्यात बैठक घेणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.






