तुळापूर येथे “शंभुशौर्य दीपोत्सव” उत्साहात संपन्न

वाघोली – छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी ‘एक दिवा शंभु राजांच्या चरणी’ या संकल्पनेतुन छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती यांच्या वतीने “शंभुशौर्य दीपोत्सव” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वसुबारस या दिवशी हा सोहळा श्री क्षेत्र तुळापूर येथे संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी संपन्न झाला. मर्दानी खेळ, शाहिरी पोवाडे, काव्यसंमेलन व व्याख्यान अश्या भरपूर कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोहित आर आर पाटील, आमदार हर्षवर्धन जाधव, संताजी जाधव यांचे तेरावे वंशज अमरसिंहराजे जाधवराव, डॉ.सुवर्णा निंबाळकर
आदेश नागवडे, रामकृष्ण सातव, सचिन जाधव, दीपक गावडे, आप्पासाहेब हरगुडे, हिरामण हरगुडे, नटराज सातव, संतोष शिवले, रुपेश शिवले उपस्थित होते.
संगमनेर येथील अमित पवार यांच्या नेतृत्वातील मर्दानी आखाडा संघ यांनी प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांची मन जिंकली. त्यानंतर शाहीर प्रवीण फणसे यांच्या शाहिरीचा कार्यक्रम झाला. नवनवीन व्याख्याते घडावे या हेतूने छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती घडावी यासाठी अनेक व्याख्यात्याना संधी देण्यात आली व काव्यसमेलनाद्वारे छत्रपतींच्या विचारांचा जागर करण्यात आला.
यावेळी रोहित पाटील यांनी आपल्या भाषणात मनोगत व्यक्त केले की, छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे हा एक विचार आहे व सर्व तरुणांनी त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. महाराष्ट्राची संस्कृती ही खऱ्या अर्थाने रुजली आहे व त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे आजचा दीपोत्सव सोहळा.
दरम्यान, सोहळ्याचे हे ७ वे वर्ष होते गेले २ वर्षे कोरोना महामारीच्या कारणास्तव आरोग्याची काळजी म्हणून सेवा समितीच्या पदाधिकार्यानी तुळापूर येथे दीपोत्सव साजरा केला नव्हता त्यामुळे या वर्षी उत्साहाचं वातावरण तुळापूर मध्ये दिसत होतं संबंध समाधी परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई ही करण्यात आली होती.
यावेळी अध्यक्ष शंकर जाधव अस म्हणाले की, “छत्रपती संभाजी राजांनी स्वराज्य अभेद्य ठेवण्याचं काम केलं आपली संस्कृती, आपली मंदिर सर्व परंपरा शिवछत्रपतींच्या नंतर खऱ्या अर्थाने शंभूराजांनी टिकवला व आपल्या पिढीला सुपूर्द केले. त्यामुळे त्यांच्या समाधी स्थळी त्यांच्या विचारांचा जागर होणं महत्वाचं आहे. म्हणूनच आपल्या सणाचा पहिला दिवा हा राजांच्या चरणी लागावा असा आमचा मानस आहे.
दीपोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उत्तम कार्य करणार्यांना “शंभुगौरव पुरस्कार” देण्यात येतो. यावर्षी पारनेरचे आमदार निलेश लंके यांना कोरोना काळात रुग्णसेवेसाठी पुरस्कार देण्यात आला व कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करता “चांडाळ चौकडीच्या करामती” या वेब सिरीज टीम ला देण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय कासार यांनी केले व प्रस्तावना वैभव साळुंके यांनी केली.
याचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे उपाध्यक्ष राहुल हरगुडे, आकाश शिंदे, सागर जगताप, मयूर गावडे, चैतन्य पोरेडी, आकाश घळके, मीना शिंदे व आरती भोगडे यांनी केले होते.





