Ajit Pawar : अखेरचा निरोप! भीमा-भामा-इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमावर अजितदादांच्या अस्थींचे विसर्जन
Ajit Pawar : त्रिवेणी संगमाच्या पवित्र जलात अस्थींचे विसर्जन; पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांची उपस्थिती.
Updated On:

Ajit Pawar – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश मंगळवारी (दि. 3) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदानभूमी असलेल्या श्री क्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे दर्शनासाठी आणण्यात आला. त्यानंतर सजवलेल्या नावेत अस्थिकलश ठेवून भीमा-भामा-इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमाच्या पाण्यात अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.
अजितदादा अमर रहे च्या घोषणा जड अंतःकरणाने नागरिकांनी भावपूर्ण वातावरणात लाडक्या नेत्याला निरोप दिला.अस्थिकलशाचे विधिवत पूजन करून उपस्थितांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तुळापुरसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुळापुर व वढू बुद्रुक येथे साकारण्यात येणारा ऐतिहासिक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करून ते पूर्णत्वास नेण्यासाठी अजित पवार यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली होती.





