Shikrapur News – श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्यभरातून आलेल्या लाखो शंभूभक्तांनी अलोट गर्दी केली होती. याप्रसंगी संपूर्ण समाधी परिसर भगवामय झाला होता. संभाजी महाराजांच्या समाधीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली, यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, शंभूराजेंचे वंशज वृषालीराजे भोसले, आमदार ज्ञानेश्वर कटके, बापूसाहेब पठारे, जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले, मोनिका हरगुडे, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अधिकारी उपस्थित होते. शासकीय पूजेनंतर शंभूराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व कवी कलश यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गृहविभागाने दिलेली शासकीय मानवंदना, ह.भ.प. संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तन हे या दिनाचे मुख्य आकर्षण ठरले. श्रीक्षेत्र तुळापूर: येथील समाधीस्थळी नतमस्तक होताना उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार व आमदार माऊली कटके. छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त हजारो शंभूभक्तांनी श्रीक्षेत्र वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील समाधीस्थळांचे दर्शन घेतले. याप्रसंगी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वढू बुद्रुक व तुळापूर येथे आयोजित ‘मूकज्योत पदयात्रेत’ सहभाग घेतला. त्यांनी आमदार माऊली कटके आदींच्या उपस्थितीत तुळापूर येथील त्रिवेणी संगमस्थळी श्रीसंगमेश्वराचेही दर्शन घेतले. राज्यभरातून आलेल्या शेकडो मशाल ज्योतींमुळे परिसर शिव-शंभूचा जयघोष दुमदुमून गेला होता. प्रशासनाच्या वतीने शंभूभक्तांसाठी महाप्रसाद, पिण्याचे पाणी, वाहनतळाची चोख व्यवस्था केली होती. यावेळी रक्तदान महायज्ञात हजारो तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. समाधीस्थळी आकर्षक फुलांची सजावट वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मेघडंबरीसह कवी कलश समाधीवर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विशेष म्हणजे फुलांनी ‘धर्मवीर शंभूराजे’ अशा अक्षरांनी शंभूभक्तांचे लक्ष वेधून घेतले.