Shai Hope Record : शाई होपचा विश्वविक्रमी धमाका! गिलख्रिस्ट-बटलरचा १९ वर्ष जुना विक्रम चक्काचूर

Shai Hope Record most sixes in one calender year : क्रिकेटच्या विश्वात दररोज नवनवीन विक्रम रचले जात असताना, वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक फलंदाज शाई होपने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा आणि ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने केलेल्या शानदार शतकी खेळीदरम्यान हा पराक्रम साधला.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात होपने ६९ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०९ धावांची धमाकेदार खेळी केली. याच खेळीत ४ षटकार मारताच त्याने एका कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० षटकार पूर्ण केले आहेत. यासह त्याने जोस बटलर आणि गिलख्रिस्टचा विक्रम मोडला.
गिलख्रिस्ट-बटलरचा मोडला विक्रम –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात यष्टिरक्षक म्हणून खेळताना एका कॅलेंडर वर्षात ५० षटकार ठोकणारा शाई होप हा पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाचा महान यष्टिरक्षक अॅडम गिलख्रिस्ट (२००५ मध्ये) आणि इंग्लंडचा जोस बटलर (२०१६ मध्ये) यांनी यष्टिरक्षक म्हणून एका वर्षात सर्वाधिक ४१-४१ षटकार मारले होते. शाई होपने या दोन्ही दिग्गजांचा विक्रम मोडत क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.
वेस्ट इंडिजचा पराभव झाल्याने शतक ठरलं व्यर्थ –
शाई होपने दमदार शतक झळकावले असले तरी, वेस्ट इंडिजच्या संघाला या सामन्यात न्यूझीलंडकडून ५ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. होप वगळता इतर फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत, त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ २४७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. प्रत्युत्तरादाखल, न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉन्वे (९०) आणि रचिन रवींद्र (५६) यांनी शतकी भागीदारी करून विजयाचा मजबूत पाया रचला. टॉम लॅथम (३९) आणि मिचेल सँटनर (३४) यांच्या उपयुक्त खेळीमुळे न्यूझीलंडने सहज विजय मिळवला.
शाई होपची कारकीर्द –
२०१६ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या होपने आतापर्यंत १४७ वनडे सामन्यांमध्ये १९ शतके आणि ३० अर्धशतकांसह ६०९७ धावा केल्या आहेत. तसेच कसोटीत २०५५ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १४०३ धावा त्याच्या नावावर आहेत.





