मध्यप्रदेशातील कॉंग्रेस सरकार पाडण्यामागे अमित शहांचा हात, राजस्थानातही तसाच प्रयत्न – मुख्यमंत्री गेहलोत

जयपूर – मध्यप्रदेशातील कॉंग्रेस सरकार पाडण्यामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात होता. राजस्थानातही त्यांनी तसाच प्रयत्न केला, असा दावा राजस्थानचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी मंगळवारी केला. एका कार्यक्रमात बोलताना गेहलोत यांनी नामोल्लेख टाळून शहा यांच्यावर निशाणा साधला. गृह मंत्र्यांना मध्यप्रदेशबाबत मोठा अहंकार होता. मात्र, राजस्थानमधील जनतेने तो उद्धवस्त केला. सरकारे पाडणे हा लोकशाहीचा मार्ग आहे का? देश कुठल्या दिशेने जात आहे ते कुणालाच माहीत नाही.
सध्या राज्यघटना आणि लोकशाहीपुढे धोका आहे. स्थिती अतिशय गंभीर आहे. प्रत्येक नागरिकाने त्यावर विचार करायला हवा, असे गेहलोत म्हणाले. मागील वर्षी मार्चमध्ये कॉंग्रेसमधील बंडखोरीमुळे त्या पक्षाचे मध्यप्रदेशातील सरकार कोसळले. त्यानंतर भाजपने त्या राज्यात पुन्हा सरकार स्थापन केले. त्यानंतर मागील वर्षीच्याच जुलैमध्ये कॉंग्रेसचे राजस्थानमधील सरकार अडचणीत आले. कॉंग्रेसच्या काही आमदारांनी गेहलोत यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले. मात्र, महिनाभराने बंडखोरांची मनधरणी करण्यात कॉंग्रेस श्रेष्ठींना यश आल्याने राजस्थान सरकारसमोरील संकट टळले.





