Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या नोटिशीला शाहरुख-अजयकडून एका वाक्यात उत्तर; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं ते विधान चर्चेत.!
राष्ट्रपती मुर्मू यांनी कलाकारांना आवाहन करताना लोकप्रिय कलाकारांनी लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक उत्पादनांचं समर्थन करू नये, असा संदेश दिला.

Tukaram Mundhe : बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘विमल इलायची’च्या जाहिरातीवरून सुरू झालेल्या वादाला आता नवं वळण मिळालं आहे. महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसांना तिन्ही कलाकारांनी उत्तर दिलं आहे.
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही कलाकारांकडून प्रतिसाद मिळाला असून, त्यापैकी दोघांनी सुनावणीची मागणी केली होती. त्यांची सुनावणीही पूर्ण झाली आहे. आता FDAकडून पुढील कायदेशीर प्रक्रियेचा आढावा घेतला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी ‘विमल इलायची’ची जाहिरात आहे. या जाहिरातीत शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ झळकले आहेत. मात्र, महाराष्ट्र FDAने या जाहिरातीमुळे ‘विमल’ या ब्रँडचा संबंध पान मसाल्याशी जोडला जाऊ शकतो का, आणि त्यामुळे ही जाहिरात अप्रत्यक्ष किंवा सरोगेट प्रमोशनच्या स्वरूपात येते का, याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
ऑगस्टमध्ये FDAने तिन्ही कलाकारांना कारणे दाखवा नोटिसा बजावत १५ दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं होतं. त्यांच्याकडून जाहिरातीशी संबंधित कागदपत्रे आणि इतर माहितीही मागवण्यात आली होती.
कलाकारांच्या वकिलांनी काय सांगितलं?
सुनावणीदरम्यान कलाकारांच्या बाजूने महत्त्वाचा दावा करण्यात आला. तिन्ही कलाकारांचा करार हा पान मसाला किंवा तंबाखूजन्य उत्पादनाच्या जाहिरातीसाठी नव्हता, तर केवळ ‘माउथ फ्रेशनर’ अर्थात इलायची उत्पादनाच्या जाहिरातीसाठी होता, असं त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आलं आहे.
म्हणजेच, कलाकारांनी ज्या उत्पादनाचं प्रमोशन केलं, ते स्वतंत्रपणे विकलं जाणारं इलायची/माउथ फ्रेशनर उत्पादन असल्याचा त्यांचा युक्तिवाद आहे. मात्र, केवळ करारात कोणत्या उत्पादनाचा उल्लेख आहे, यावरच प्रकरण संपणार नसून जाहिरातीची मांडणी, ब्रँडची ओळख आणि संबंधित उत्पादनांशी असलेला संबंध यासह इतर बाबींचाही FDAकडून विचार केला जात आहे.
राष्ट्रपती मुर्मूंच्या आवाहनाचीही चर्चा !
दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटी जाहिराती आणि सार्वजनिक आरोग्याचा मुद्दाही चर्चेत आला आहे. २२ सप्टेंबर रोजी झालेल्या ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकप्रिय कलाकारांनी आरोग्यासाठी हानिकारक उत्पादनांच्या जाहिराती करताना सावध राहावं, असं आवाहन केलं होतं. लोकप्रिय कलाकारांच्या शब्दांचा आणि कृतींचा विशेषतः तरुणांवर प्रभाव पडतो, असं त्यांनी नमूद केलं.
राष्ट्रपती मुर्मू यांनी कलाकारांना आवाहन करताना लोकप्रिय कलाकारांनी लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक उत्पादनांचं समर्थन करू नये, असा संदेश दिला आणि “खरा स्टार तोच, जो प्रकाश पसरवतो; अंधार नाही” असं म्हटलं होतं. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्र FDAच्या पुढील निर्णयाकडे लागलं आहे.






