Sexual Harassment Case – कार्यालयात महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन आणि लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून आनंद राठी वेल्थ लिमिटेड या कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुडबुद्धीने फिर्यादीची दुबईत बदली केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत केला आहे. या प्रकरणामुळे कॉर्पोरेट क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी स्वपन चक्रवर्ती (कार्यकारी संचालक) यांच्यावर कामाच्या ठिकाणी महिलेशी लगट करणे, जबरदस्तीने विनयभंग तसेच वारंवार लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. याशिवाय, राकेश रावळ (सीईओ), फिरोज अझीझ (जॉईंट सीईओ), तेजस शहा (एचआर हेड) आणि एम महिला (कार्यकारी संचालक) यांच्यावरही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात ३३ वर्षीय महिलेने मुंबईतील एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. संबंधित घटना पुण्यात ४ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान घडल्याने हा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कंपनीत कार्यरत असताना स्वपन चक्रवर्ती यांनी तिच्याशी वेळोवेळी गैरवर्तन केले. तक्रार केल्यास करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. तसेच तिचा सतत पाठलाग करून मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. महिलेने या प्रकाराबाबत कंपनीच्या वरिष्ठांकडे आणि मानव संसाधन विभागाकडे तक्रार केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. उलट आरोपीला प्रोत्साहन दिले आणि सुडबुद्धीने संबंधित महिलेची दुबई येथे बदली केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विनयभंग व लैंगिक छळाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.