Pimpri : वाल्हेकरवाडी, रावेत येथील सांडपाणी थेट नदीपात्रात

पिंपरी : वाल्हेकरवाडी परिसरात सांडपाणी थेट पवना नदीपात्रात सोडले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे थेरगाव कोल्हापुरी बंधाऱ्याच्या वरती नदी वारंवार फेसाळलेली दिसते. पुनावळे भागातील सांडपाण्याची पाइपलाइन फुटणे, चोकअप होणे असे प्रकार घडत असल्यामुळे सांडपाणी नदीपात्रात मिसळत आहे. परिणामी, थेरगाव येथील कोल्हापुरी बांधारा येथे नदीपात्र फेसाळते आहे. त्यामुळे जल प्रदूषणाचा मुद्दा गंभीर बनत असला तरी पाण्यातील जलचर मृत्यूमुखी पडू लागले आहेत.
शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी नदीपात्राच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनेकदा चर्चेचा खल होऊनही यावर तोडगा काढण्यात स्थानिक प्रशासनाला अपयश आले आहे. थेरगाव नदीपात्रातील बंधाऱ्यावर वाल्हेकरवाडी हद्दीतून सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे वारंवार थेरगाव परिसरातील कोल्हापुरी बंधारा येथे नदीपात्रातील पाणी फेसाळून प्रदूषण होत आहे. येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र नसल्यामुळे दूषित पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याचे नागरिकांची म्हणणे आहे.
पुनावळे गावठाणच्या पश्चिमेकडे मुंबई-पुणे रस्त्यालगतच्या भागात (पुनावळे) जुना कचरा डेपो आरक्षित आहे. येथील गायरान भागात लोकवस्ती वाढत चालली आहे. येथे राहणा-या नागरिकांच्या सांडपाण्याचे कोणतेही नियोजन नाही.
सांडपाणी रस्त्यावर येऊन महामार्गाच्या खालून ओढ्यातून वाहते. सांडपाण्यासाठी रावेत बंधाऱ्यालगत राम मंदिराच्या पाठीमागून मनपा शाळा, बौद्ध विहार, रावेत बंधाऱ्याची भिंतीच्या बाजूने पाइपलाइन टाकलेली आहे. ही पाइपलाइन वारंवार फुटत असल्यामुळे सांडपाणी थेट बंधा-यातील पाण्यात मिसळत आहे.





