पुणे जिल्हा | यंदा साडेसतरा हजार टन गाळप होणार

देऊळगावराजे, (वार्ताहर)- कारखान्याने मागील हंगामापासूनच वाढीव गाळपक्षमतेने गाळप केले असून येणाऱ्या २०२४-२५ च्या गळीत हंगामातही दररोज सरासरी १७ हजार ५०० टन गाळप होणार आहे.
यावर्षी पर्जन्यमान चांगले असल्यामुळे उसाची उपलब्धता समाधानकारक होणार आहे, अशी माहिती आलेगाव येथील दौंड शुगर कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी दिली. आलेगाव येथील दौंड शुगर कारखान्याचे मिल रोलर पूजन संचालक वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यंदाच्या गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडण्यासाठी कारखान्यातील मशिनरी दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून ऊस तोडणी वाहतुकीचे करार करण्याचे काम सुरू आहे, असे कारखान्याचे पूर्णवेळ संचालक शहाजी गायकवाड यांनी संगितले.
याप्रसंगी प्रदुम्न जोशी, प्रवीणकुमार काळे, आबासाहेब सुरवसे, दीपक वाघ, दिलीप बोडखे, अभिजीत शितोळे, सुरेश घाडगे, मुरलीधर शिंदे, नरेश नागवे, फारूख डुंगे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गेल्यावर्षी ऊस गळित हंगामात अठरा लाख ऐंशी हजार अठराशे सत्याहत्तर हजार 1801877.186 मेट्रिक टन गाळप होऊन सरासरी साखर उतारा 10.82 टक्के पडला असल्याने येणार्या गळीत हंगामात उद्दिष्ट 18 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. – वीरधवल जगदाळे, दौंड शुगर संचालक.





