सेवा क्षेत्रात उसळी! पीएमआय निर्देशांक 60.5 वर, पण ऑगस्टमध्ये धोका वाढतोय?

नवी दिल्ली – देशातील आणि परदेशातील परिस्थिती खराब असतानाही जुलै महिन्यामध्ये भारतातील सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढून 11 महिन्यांच्या उच्चाहकावर गेली आहे. या महिन्यात या क्षेत्रातून निर्यात आणि देशांतर्गत विक्री वाढली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता परदेशातील परिस्थिती जास्त बिघडली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील आकडेवारीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असे गृहीत धरले जाऊन लागले आहे.
जुलै महिन्यातील सेवा क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक म्हणजे परचेसिंग मॅनेजर इंडेक्स वाढून 60.5 इतका भरला आहे. जून महिन्यामध्ये हा निर्देशांक 60.4 इतका होता. अगस्ट 2024 नंतर प्रथमच निर्देशांक इतक्या उच्च पातळीवर असल्याचे हा निर्देशांक तयार करणार्या एचएसबीसी या कंपनीचे मुख्य अर्थतज्ञ प्रांजल भंडारी यांनी सांगितले. हा निर्देशांक 50 अंकाच्या वर असल्यानंतर हे क्षेत्र विस्तारात असल्याचे समजले जाते. गेल्या अनेक महिन्यापासून या क्षेत्राचा निर्देशांक 50 अंकाच्यावर आहे.
भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात सेवा क्षेत्राचे योगदान इतर क्षेत्रापेक्षा जास्त असते. उपलब्ध आकडेवारीनुसार जुलै महिन्यामध्ये अमेरिका वगळता इतर देशातून भारतीय उत्पादनांना बरीच मागणी आली. त्यामुळे या क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक वाढण्यास मदत झाली. दरम्यानच्या काळात रिझर्व बँकेने व्याजदरात बरीच कपात केली आहे. त्यामुळे या क्षेत्राला भांडवल पुरवठा कमी व्याजदरावर उपलब्ध होत आहे. त्यामुळेही या क्षेत्रातील घडामोडी वाढत असल्याचे सांगण्यात आले.
पतधोरणाकडे लक्ष –
किरकोळ आणि घाऊक किमतीवर आधारित महागाई सध्या अपेक्षेपेक्षा कमी पातळीवर आहे. त्याचबरोबर पाऊस चांगला पडल्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत रिझर्व बँकेचे पतधोरण बुधवारी जाहीर होणार आहे. या पतधोरणाकडे सेवा क्षेत्रातील उद्योगांचे लक्ष असल्याचे सांगण्यात आले.





