मुंबई – जागतिक आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे भारताची मॅन्युफॅक्चरिंग आणि वस्तूंची निर्यात कमी झाली आहे. त्याचा राष्ट्रीय उत्पन्नावरही परिणाम होत असल्याची आकडेवारी शुक्रवारी जाहीर झाली. मात्र अशा अवस्थेमध्ये भारताचे सेवा क्षेत्र दमदार कामगिरी करीत आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये सेवा क्षेत्राची निर्यात तब्बल 22.3 टक्क्यांनी वाढून 34.3 अब्ज डॉलर इतकी झाली असल्याची माहिती रिझर्व बँकेने जारी केली आहे. सप्टेंबर महिन्यातही सेवा क्षेत्राची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला या क्षेत्राकडून चांगलाच आधार मिळत आहे. या क्षेत्रातील रोजगार निर्मिती वाढण्याबरोबरच निर्यात वाढल्यामुळे भारताला परकीय चलन उपलब्ध होऊन भारताची चालू खात्यावरील तुट कमी होण्यास मदत मिळते. चालू खात्यावरील तूट कमी झाल्यास रुपयाच्या मूल्याला आधार मिळतो. सध्या डॉलर बळकट होत असल्यामुळे रुपयाचे मूल्य वेगाने कमी होत आहे. मात्र जर सेवा क्षेत्राची निर्यात आणखी वाढली तर भारतामध्ये परकीय चलन येऊन रुपयाचे मूल्य स्थिर होण्यास किंवा बळकट होण्यास मदत मिळू शकते असे समजले जाते. ऑगस्ट आणि जुलै महिन्यामध्ये सेवा क्षेत्राची निर्यात कमी झाली होती. मात्र सप्टेंबर महिन्यात ती वाढून 32.57% इतकी झाली आहे. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये ही निर्यात वाढून 34.3 अब्ज डॉलरवर गेली आहे. या आकडेवारी बद्दल निर्यातदारांनी समाधान व्यक्त केले आहे.