Covid vaccine : केंद्र सरकारला कोविशिल्डचे 2 कोटी डोस मिळणार मोफत; सीरम इन्स्टिट्यूटचा प्रस्ताव

नवी दिल्ली – सीरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारला कोविशिल्ड या करोना लसीचे 2 कोटी मोफत डोस देऊ केले आहेत. चीनसह काही देशांत करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर, सीरमकडून मोफत डोसचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
सीरमकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये कोविशिल्डचे 410 कोटी रूपये किमतीचे डोस सरकारला कुठलेही शुल्क न घेता पुरवण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. संबंधित डोस पाठवण्याची व्यवस्था कशाप्रकारे केली जावी याची माहितीही सीरमने मंत्रालयाकडून मागवली आहे.
करोना संकट दाखल झाल्यानंतर भारतात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. त्यासाठी सीरमने सरकारला कोविशिल्डचे 170 कोटींहून अधिक डोस पुरवले. चीन, दक्षिण कोरिया आणि इतर काही देशांत करोना संकटाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे भारतातही सावधगिरी बाळगण्यात येत आहे.
आतापर्यंत देशातील केवळ 27 टक्के प्रौढांनी करोना लसींचा तिसरा म्हणजे बूस्टर डोस घेतला आहे. आता ते प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे.





