पुणे | आफ्रिकन देशांना पाठवली मलेरिया प्रतिबंधक लस

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सीरम इन्स्टिट्यूट अॉफ इंडियाने मलेरिया प्रतिबंधक लसीचे ४३ हजार २०० डोस (R21/Matrix-M™ ) सोमवारी (दि. २० मे) आफ्रिकन देशांसाठी पाठवले आहेत. मलेरियाविरुद्धच्या जागतिक लढ्यात हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
पहिल्या टप्प्यातील हे डोस शिपमेंट सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक (सीएआर) ला पाठवले जाणार आहेत. त्यानंतर आगामी दिवसांमध्ये दक्षिण सुदान आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो सारख्या इतर आफ्रिकन देशांना पाठवले जाणार आहे. “सीएआर’ क्षेत्रासाठी ठरवलेल्या एकूण १ लाख ६३ हजार ८०० डोसपैकी, सीरमतर्फे पहिल्या टप्प्यात ४३ हजार २०० डोस पाठवण्यात आले आहेत.
यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी, असोसिएट फेलो, क्लिनिकल लेक्चरर इन इन्फेक्शियस डिसीज, नफिल्ड डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड च्या डॉ. मेहरीन दाटू, नोव्होवॅक्सच्या कार्यकारी उपाध्यक्ष, मुख्य कॉर्पोरेट व्यवहार आणि वकिली अधिकारी सिल्व्हिया टेलर आदी उपस्थित होते. आतापर्यंत सीरमने असे २५ दशलक्ष डोस तयार केले आहेत. तसेच ही लस आफ्रिकेन देशांसाठी पाठवून सीरमने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि नोवोवॅक्स च्या मॅट्रिक्स-एम यांच्या सहकार्याने विकसित केलेली ही लस मलेरियाचा प्रादुर्भाव झालेल्या आफ्रिकेतील स्थानिक प्रदेशातील मुलांसाठी वापरण्यासाठी अधिकृत केलेली दुसरी मलेरिया लस आहे. या लसीला युरोपियन आणि विकसनशील देशांच्या क्लिनिकल ट्रायल्स पार्टनरशिप, वेलकम ट्रस्ट आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक यांच्याकडून मान्यता मिळाली आहे.





