Serbian student : सर्बियातल्या विद्यार्थ्यांचे रात्रभर रास्ता रोको

नोवी साद, (सर्बिया) – देशातील भ्रष्टाचाराविरोधात सर्बियातल्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन अधिक भडकले आहे. विद्यार्थ्यांनी कडक थंडीतही नोवी साद शहरातल्या डेन्यूबे पूलावरील वाहतूक रोखून धरली होती. डझनभर शेतकऱ्यांनी पूलावर ट्रॅक्टर आडवे लावून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
नोवी सादच्या रहिवाशांनीही या आंदोलकांना पाठिंबा देऊन आंदोलनकर्त्यांना चहा आणि भोजनाचे साहित्य उपलब्ध करून दिले. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन चिरडण्यासाठी अध्यक्ष अलेक्सांदर वुसिक यांच्या समर्थकांकडून आंदोलकांवर हल्ले केले जाण्याची शक्यता आता अधिकच बळावली आहे.
दिनांक १ नोवेहेंबर रोजी नोवी साद शहरातील रेल्वे स्थानकाचा एक भाग कोसळल्यामुळे १५ जण ठार झाले होते. या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करून सर्बियातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
अध्यक्ष वुसिक यांच्याविरोधात दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचे आरोप अधिक तीव्र होत आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सर्बियाचे पंतप्रधान मिलोस वुसेविक यांना यापुर्वीच राजीनामा द्यावा लागला आहे.
सर्बियातल्या सरकार धार्जिण्या माध्यमांनी आंदोलनाचे वृत्त दाबण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सोशल मीडियावरचे फोटो आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दखल घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक भडकले असल्याचे समजते आहे.
मात्र विद्यार्थ्यांनी पुलावरील वाहतूक रोखण्यामागे सत्तारुढ सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीने जोरदार टीका केली आहे. या आंदोनाचे वार्तांकन करणाऱ्या माध्यमांनी मूल्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप होतो आहे.
शनिवारी रात्री विद्यार्थ्यांनी १५ मिनिटांचे मौन पाळून रेल्वे स्तानक दुर्घटनेतील मृतांना आदरांजली वाहिली. विद्यार्थ्यांनी ३ पूलावरची वाहतूक रोखली होती. मात्र त्यानंतर हे विद्यार्थी एकाच पुलावर एकत्र आले आहेत. पुलावरच हे विद्यार्थी बास्केटबॉल, व्हॉलिबॉल खेळून वेळ घालवत आहेत.





