Stock Market : ‘या’ कारणांमुळे सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार घसरला
Stock Market : कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे सेन्सेक्स 281 अंकांनी घसरला. निफ्टी 78 अंकांनी खाली येत 24,287.65 वर बंद झाला.

Stock Market : कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील कायम असलेल्या भू-राजकीय तणावामुळे भारतीय शेअर बाजारावर सोमवारी दबाव राहिला. सेन्सेक्स आणि निफ्टी सलग पाचव्या दिवशी घसरणीसह बंद झाले.
30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स 281.09 अंकांनी म्हणजेच 0.36 टक्क्यांनी घसरून 77,728.16 अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 555.5 अंकांनी घसरून 77,453.75 अंकांपर्यंत खाली आला होता.
50 शेअर्सचा एनएसई निफ्टी 78.35 अंकांनी म्हणजेच 0.32 टक्क्यांनी घसरून 24,287.65 अंकांवर स्थिरावला. निफ्टीतील घसरणीची मालिका यामुळे सलग पाचव्या सत्रात कायम राहिली.
सेन्सेक्समधील इन्फोसिस, एचसीएल टेक, सन फार्मा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्रा आणि आयटीसी हे प्रमुख घसरणारे शेअर्स ठरले. तर टाटा स्टील, अॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.
तज्ज्ञांचे मत –
दरम्यान, जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचा प्रमुख दर असलेल्या ब्रेंट क्रूडच्या किमतीत 1.11 टक्क्यांची वाढ होऊन ती 89.50 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली. अमेरिका-इराण संघर्षाबाबतची अनिश्चितता आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पुन्हा खुला करण्याच्या दिशेने ठोस प्रगती न झाल्याने गुंतवणूकदार सावध राहिले, असे एनरिच मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोनमुडी आर. यांनी सांगितले.
एचएसटी वेल्थचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हरिसेल्वन राधाकृष्णन यांच्या मते, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा गुंतवणूकदारांच्या भावनेवर दबाव कायम राहिला. मात्र, दिवसातील नीचांकी पातळीवरून बाजाराने काही प्रमाणात सावरत व्यवहार पूर्ण केला.
जागतिक बाजारातील परिस्थिती –
आशियाई बाजारात जपानचा निक्केई 225, शांघाय एसएसई कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक वाढीसह बंद झाले. दक्षिण कोरियाचा बाजार सुट्टीमुळे बंद होता. युरोपीय बाजार संमिश्र स्थितीत व्यवहार करत होते. अमेरिकेतील बाजार शुक्रवारी घसरणीसह बंद झाले होते.
दरम्यान, शुक्रवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) 508.12 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली होती. शुक्रवारी सेन्सेक्स 70.71 अंकांनी घसरून 78,009.25 अंकांवर, तर निफ्टी 29.85 अंकांनी घसरून 24,366 अंकांवर बंद झाला होता.





