सोलापूर/नवी दिल्ली : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणात पोलिसांनी राजधानी दिल्लीतून एका मांत्रिकाला अटक केली आहे. याच मांत्रिकाच्या इशाऱ्यानुसार एका महिलेने गोरे यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे. साताऱ्यातील वडूज पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे या प्रकरणी अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप एका महिलेने केला होता. या प्रकरणी महायुतीच्या गोटात एकच खळबळ माजली होती. पण त्यानंतर त्याच महिलेला मंत्री गोरे यांच्याकडून 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यामुळे तिने केलेल्या आरोपांची हवा निघून गेली होती. या पार्श्वभूमीवर वडूज पोलिसांनी दिल्लीत जाऊन अशोक शर्मा नामक मांत्रिकाला अटक केली आहे. या प्रकरणी अगोदरच खंडणी मागणाऱ्या महिलेसह सत्ताधारी शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी अनिल सुभेदार व अन्य एका पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मांत्रिक अशोक शर्मा हा राजधानी दिल्लीतील लक्ष्मीनगर परिसरात वास्तव्यास होता. तोच मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या महिलेला वेळोवेळी मार्गदर्शन करत होता. त्याने तशी कबुलीही पोलिसांकडे दिली आहे. दिल्लीतील एक मांत्रिक संबंधित महिलेला मदत करत असल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वडूज पोलिसांच्या एका पथकाने दिल्लीत धाव घेतली होती. त्यांनी मथुरेजवळ सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपी मांत्रिकाच्या मुसक्या आवळल्या. खंडणी मागणाऱ्या महिलेला मिळणाऱ्या 1 कोटींच्या खंडणीचा काही हिस्सा या मांत्रिकाला देण्याचे ठरले होते, असे पोलिसांनी सांगितले आहे.