Hingoli : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी सेनगावमध्ये मातंग समाजाचा मोर्चा
Hingoli : अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण आणि ६ टक्के स्वतंत्र आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सेनगाव तहसील कार्यालयावर मातंग समाजाचा मोर्चा.

Hingoli : अनुसूचित जातींचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तातडीने उपवर्गीकरण करावे आणि मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) सेनगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सेनगाव तालुका सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित या मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा अधिकार राज्यांना दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही उपवर्गीकरण लागू करावे, अशी मागणी करण्यात आली. अनुसूचित जातींचे वंचित आणि इतर असे दोन गट करून विद्यमान १३ टक्के आरक्षणापैकी ६ टक्के आरक्षण वंचित घटकांसाठी राखीव ठेवावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
याशिवाय १९६० पासूनचा भरतीतील अनुशेष भरावा, शैक्षणिक प्रवेश आणि शासकीय योजनांमध्ये स्वतंत्र संधी द्यावी, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा, मुंबई विद्यापीठाला त्यांचे नाव द्यावे, महामंडळाला एक हजार कोटींचा निधी द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
मोर्चात अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, गणपत भिसे, राधाजी शेळके, मातंग योद्धा ग्रुपचे सदस्य आणि समाजबांधव उपस्थित होते.





