Akkalkot : अक्कलकोटमधून श्री स्वामी समर्थांच्या पालखी परिक्रमेला प्रारंभ; आठ महिने महाराष्ट्रासह तीन राज्यांत भ्रमंती
Akkalkot :

Akkalkot : ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’, ‘सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय’ आणि ‘श्री अन्नपूर्णामाता की जय’च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखी परिक्रमेचे गुरुवारी (दि. १२ नोव्हेंबर) तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथून उत्साहात प्रस्थान झाले. यंदा या पालखी परिक्रमेचे ३० वे वर्ष आहे. पुढील आठ महिने ही पालखी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यातील विविध जिल्ह्यांतून प्रवास करणार असून, ७ जुलै २०२७ रोजी अक्कलकोट येथे परतणार आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक महेश इंगळे, देवस्थानचे पुरोहित मंदार मोहनराव पुजारी, तसेच श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी अण्णू महाराज पुजारी, धनंजय पुजारी, मोहित पुजारी आणि चैतन्य शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे पूजन करून परिक्रमेचा शुभारंभ करण्यात आला.
त्यानंतर न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महानैवेद्य पूजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, पुरोहित मंदार पुजारी, अण्णू महाराज पुजारी, धनंजय पुजारी, व्यंकटेश पुजारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
अक्कलकोट शहरातून पालखीची मिरवणूक
महाप्रसादालयात पालखीचे पूजन झाल्यानंतर न्यास परिसरातील श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर आणि श्री भवानी माता मंदिर येथेही पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखीने अन्नछत्रातून परिक्रमेच्या प्रवासाला सुरुवात केली. राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ, सोन्यामारुती चौक, वीर सावरकर चौक, मेन रोड आणि कारंजा चौक या मार्गाने पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
बुधवार पेठेतील समाधी मठात आरती करण्यात आली. त्यानंतर श्री मल्लिकार्जुन मंदिर आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकातील बसस्थानक परिसरातील श्री खंडोबा मंदिरात आरती करून पालखी सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. अक्कलकोट शहरातील विविध ठिकाणी भाविकांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
आठ महिने सुरू राहणार परिक्रमा
पालखी परिक्रमेच्या नियोजनानुसार १२ नोव्हेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील सोहाळे येथे पालखीचा मुक्काम होता. त्यानंतर शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी पालखी सांगली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. पुढील आठ महिन्यांत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक आणि गोवा राज्यातील अनेक भागांत पालखी परिक्रमा होणार आहे. ७ जुलै २०२७ रोजी तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे या परिक्रमेचा समारोप होणार आहे.
गेल्या २९ वर्षांपासून न्यासाच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची पालखी परिक्रमा आयोजित केली जाते. यंदा या उपक्रमाचे ३० वे वर्ष आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांबरोबरच कर्नाटकातील बेळगाव येथेही पालखीचा मुक्काम असतो. गोवा राज्यातील दोन जिल्ह्यांतूनही पालखी प्रवास करते. याशिवाय मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यांतूनही पालखी परिक्रमेच्या आयोजनासाठी मागणी होत असल्याचे न्यासाच्या वतीने सांगण्यात आले.
गावोगावी स्वामींचे दर्शन घडविण्याचा उद्देश
अक्कलकोट येथे येणे शक्य नसलेल्या स्वामीभक्तांना त्यांच्या गावातच श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेता यावे, हा या परिक्रमेचा मुख्य उद्देश आहे. वयोवृद्ध नागरिक, महिला आणि विविध कारणांमुळे अक्कलकोटला येऊ न शकणाऱ्या भाविकांसाठी ही परिक्रमा आयोजित केली जाते. पालखीच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांचे दर्शन आणि सेवा करण्याची संधी राज्यभरातील भक्तांना उपलब्ध करून दिली जाते.
स्वामी समर्थांच्या भक्तीचा प्रसार गेल्या सव्वाशे वर्षांपासून देशभरात झाला आहे. पालखी आपल्या गावात येणे ही भक्तांसाठी श्रद्धा आणि सेवाभाव व्यक्त करण्याची संधी असल्याची भावना न्यासाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
अन्नछत्र मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम
तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने दररोज दोन वेळा हजारो भाविकांना महाप्रसाद दिला जातो. अन्नछत्राच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडाविषयक उपक्रम राबविले जातात. तसेच आपत्तीग्रस्तांना मदत, आरोग्यविषयक कार्यक्रम आणि शासनाच्या विविध उपक्रमांना सहकार्य केले जाते.
स्वामीभक्तांच्या निवासासाठी न्यासाच्या मालकीच्या जागेत यात्री निवास, यात्री भुवन आणि अतिथी निवास अशा सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. न्यासाच्या परिसरात श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर, श्री भवानी माता मंदिर, कपिला गाय, स्वामींची उभी मूर्ती, कारंजा, शिवस्मारक, इनडोअर आणि आऊटडोअर जिम, वाहनतळ, बालोद्यान आणि शिवचरित्र प्रदर्शन हॉल अशा सुविधा आहेत.
६५ कोटींचे भव्य महाप्रसादगृह उभारणीच्या टप्प्यात
स्वामीभक्तांसाठी न्यासाच्या परिसरात भव्य महाप्रसादगृहाची उभारणी सुरू आहे. पाच मजली असलेल्या या इमारतीवर ५१ फूट उंचीची श्री स्वामी समर्थांची मूर्ती उभारण्यात येणार आहे. वातानुकूलित असलेल्या या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्र १ लाख ९ हजार ३९७ चौरस फूट आहे.
या महाप्रसादगृहात एकाच वेळी दोन हजार भाविकांना महाप्रसाद घेता येणार आहे, तर आणखी पाच हजार भाविकांची प्रतीक्षा करण्याची क्षमता नियोजित करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ६५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती न्यासाच्या वतीने देण्यात आली.
याशिवाय न्यासाच्या परिसरात अग्निशमन व्यवस्था, रुग्णवाहिका, प्रशस्त वाहनतळ, सौरऊर्जा प्रकल्प आणि राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहकांसाठी आधुनिक निवासव्यवस्था उपलब्ध आहे. पौर्णिमा, चतुर्थी, एकादशी यांसह विविध धार्मिक उत्सव आणि कार्यक्रमही न्यासाच्या वतीने आयोजित केले जातात.
अनेक मान्यवरांची उपस्थिती
पालखी प्रस्थान सोहळ्यास न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, प्रा. सायबण्णा जाधव, पालखी परिक्रमेचे मुख्य संयोजक संतोष भोसले, मनोज निकम, अरविंद शिंदे, नितीन शिंदे, माजी नगरसेवक चंद्रकांत बोदले यांच्यासह न्यासाचे पदाधिकारी, विश्वस्त, पुरोहित, सेवेकरी आणि स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालखी परिक्रमेविषयी अधिक माहितीसाठी मुख्य संयोजक संतोष भोसले (९८२२८१०९६६, ८५५८८५५६७५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी केले आहे.





