पीक विम्याचा परतावा मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; विमा कार्यालयाची तोडफोड

हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिकविम्याची रक्कम मिळाली नसल्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. 13) दुपारी सेनगाव येथील पिकविमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली.
यावेळी पिकविमा मिळालाच पाहिजे, अशा घोषणाही देण्यात आल्या. हिंगोली जिल्ह्यातील सुमारे 3 लाख शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगामात पिकविमा काढला आहे. सततच्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या संदर्भात जिल्हा प्रशासनानेही शासनाकडे नुकसानीचा अहवाल पाठविला आहे. त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांना 154 कोटी रुपयांची मदत जाहिर करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली.
शासनाने शेतकऱ्यांना 154 कोटी रुपयांची मदत जाहिर करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली. मात्र पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीनंतरही पिकविमा मिळालाच नाही. काही ठिकाणी विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात कमी क्षेत्र
दाखविले तर काही ठिकाणी प्रत्यक्ष शेतात न जाताच स्वतःच शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या केल्याचे प्रकार उघड झाले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनपिकविम्याची रक्कम देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे नेते रवीकांत तुपकर,जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, गजानन कावरखे, गजानन सावंत, शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठाण मांडले होते. यावेळी 15 दिवसांत मागील वर्षीची 13.89 कोटी रुपयांची रक्कम तसेच यावर्षीची पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे लेखी आश्वासन (ता. 23 )डिसेंबर रोजी देण्यात आले होते.
दरम्यान, या मुदतीनंतरही पिकविम्याची रक्कम मिळाली नसल्याचे स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, गजानन कावरखे, गजानन सावंत, शिंदे यांनी आज दुपारी सेनगाव येथील पिकविमा कंपनीचे कार्यालय गाठले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याला पिकविम्याबाबत माहिती विचारली असता त्याला योग्य उत्तरे देता आली नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पिकविमा कंपनीच्या कार्यालयात खुर्च्याची तोडफोड केली तसेच बोर्डही फेकून दिला तर टेबल कार्यालया बाहेर फेकून दिला आहे.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला 15 दिवसांची दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे आज सेनगाव कार्यालयात विचारण्यासाठी गेलो होतो, मात्र तेथे उडवा उडवीची उत्तरे मिळाली. आता पिकविम्याच्या मागणीसाठी (ता. 15) जानेवारी पासून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे, नामदेव पतंगे यांनी म्हंटले आहे.




