पुणे जिल्हा | माळेगाव अभियांत्रिकीच्या १० विद्यार्थ्यांची मिडासमध्ये निवड

माळेगाव, (वार्ताहर)- शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित महाविद्यालय आहे. चालू शैक्षणिक वर्षांमध्ये पुणे जिल्हा ग्रामीण भागामधील सर्वाधीक प्लेसमेंट देणारे महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळालेला आहे.
मागील चार वर्षांमध्ये १५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महाविद्यालयामार्फत नोकरीची संधी मिळालेली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नव-नवीन क्रियाशील उपक्रम राबवण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असते.
याचाच परिपाक म्हणून महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रेसर असणाऱ्या मिडास ऑटो या कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांनी दिली.
सर्व क्षेत्रात यशस्वी असणारे उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाचा लौकिक आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवर आधारित कार्यशाळांचे महाविद्यालयामार्फत आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांनी दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप व संचालक मंडळ , विश्वस्त रवींद्र थोरात, वसंतराव तावरे, अनिल जगताप, महेंद्र तावरे, रामदास आटोळे, गणपत देवकाते, निमंत्रित सदस्या सीमा जाधव ,चैत्राली गावडे, संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांनी अभिनंदन केले.
दोन स्तरावर मूल्याकंन
विद्यार्थ्यांच्या निवडीची प्रक्रिया ही ॲप्टीट्यूड टेस्ट व टेक्निकल इंटरव्यू या दोन स्तरावर मूल्यांकन करून संपन्न झाली. निवड प्रक्रियेत मेकॅनिकल विभागातील ५ विद्यार्थ्यांना, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील २ विद्यार्थी व इलेक्ट्रिकल विभागातील २ विद्यार्थी यशस्वी झाले.
महाविद्यालयातील अभिषेक धुमाळ, विशाल शेजार, प्रणव शिंदे, सोनाली गुंजवटे, वैभव शिंदे, प्रेरणा माने, प्रवीण सावंत, कुणाल निंबाळकर, साक्षी वाबळे, सिद्धांत शिंदे या विद्यार्थ्यांच्या निवडीमध्ये समावेश झाला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ३.५ लाख वेतन कंपनीतर्फे देण्यात येणार आहे.



