जम्मूत आज सुरक्षा यंत्रणेची कसोटी लागणार

नमाज पठणासाठी जमावबंदीचे कलम शिथील करण्यात येणार
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरविषयीचे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर आज राज्यभरात तैनात असणाऱ्या सुरक्षा यंत्रणांची खरी कसोटी लागणार आहे. आज शुक्रवार असल्याने नमाज पठणासाठी जमावबंदीचे कलम 144 शिथील करण्यात येणार आहे. काश्मीरच्या निर्णयानतर पहिल्यांदाच जमावबंदी शिथील करण्यात येणार असल्याने आजचा दिवस सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने अधिक महत्वाचा असणार आहे.
जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. गुरुवारी श्रीनगरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मलिक यांनी शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या सामान्यांना काहीही त्रास होऊ नये यासाठी करण्यात आलेल्या बंदोबस्ताचा आढावा घेतला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जमावबंदी लागू असतानाही उत्तर काश्मीरमध्ये पाच तर दक्षिण काश्मीरध्ये दगडफेकीच्या दोन घटना घडल्या आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जुलै पासून ऑगस्टपर्यंतच्या काळात पाकिस्तानने सात वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.




