पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सिक्युरिटी मार्केट विषयात अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारावर नुकतेच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
कुलगुरू करमळकर म्हणाले, या करारामुळे वाणिज्य विषयात विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या व नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तर, एस. के. मोहंती म्हणाले, विद्यार्थ्यांना सिक्युरिटी मार्केटमध्ये अभ्यास करण्यासाठी आमच्या माध्यमातून एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, याचा आम्हाला आनंद होत आहे.
दरम्यान, या सामंजस्य करारानुसार विद्यार्थ्यांना सिक्युरिटी मार्केट, फायनान्स, फायनांशीयल इंजिनीअरिंग, डेटा सायन्स हे विषय अभ्यासता येणार आहे. यामध्ये विद्यार्थी, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदवी, पदविका आणि पीएच.डी अशा विविध प्रकारे अभ्यासक्रम पूर्ण करू शकणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना संयुक्तरित्या संशोधन करता येणार आहे. तसेच ग्रंथालय, शिक्षकवर्ग, रिसर्च प्रोजेक्ट यांचेही आदान प्रदान करता येणार आहे.