ग्राहकांच्या आशीर्वादामूळ सी-फूड भरारी

आशीर्वाद मच्छी ढाब्यानं बारामती शहरातील इंदापूर व भिगवण रोडवर आपलं साम्राज्य निर्माण केल्यानंतर हा चवदार प्रवास आता घरगुती मसाल्यांच्या दिशेनं निघाला आहे. अर्थात इथंच थांबतील ते राऊत (कोळी) बंधू कसले? त्यांना आधी पुणे-मुंबईसह आख्खा महाराष्ट्र पादाक्रांत करायचा आहे. छोट्याशा गाळ्यापासून सुरुवात करत गरुडझेप घेणाऱ्या राऊत (कोळी) बंधूंशी दैनिक प्रभातच्या वर्धापनदिनानिमित्त साधलेला हा संवाद
हॉटेल व्यवसायाचा कोणताही अनुभव नसताना एक कुटुंब या व्यवसायात येतं आणि केवळ चवीच्या जोरावर आपलं स्वतंत्र विश्व निर्माण करतं, आपला दबदबा निर्माण करतं, ही गोष्ट आश्चर्य वाटावी अशीच आहे. पण हेच आश्चर्य अविरत मेहनत आणि प्रचंड कष्ट यांच्या जोरावर प्रत्यक्षात आणलं आहे आशीर्वाद मच्छी ढाबा या अनोख्या फूड जॉइंटनं! बारामतीत चांगली मच्छी कुठं मिळते, असा प्रश्न कोणालाही विचारल्यावर सगळ्यांच्या तोंडी एकच नाव येतं, ते म्हणजे आशीर्वादचं! इतकी ग्राहकांच्या तोंडी आशीर्वादची चव रुजली आहे.
ही चव रुजण्यामागे आहेत, अतुल आणि पप्पू राऊत (कोळी) हे दोघं भाऊ! बारामती तालुक्यातलं काटेवाडी हे त्यांचं गाव. आई-वडील आणि दोन बहिणी असा त्यांचा परिवार. परिस्थिती जेमतेम. वडील सरकारी नोकरीत. त्यामुळं साहजिकच चांगलं शिक्षण घेऊन नोकरी वगैरे करावी, असंच या दोघा भावांच्या डोक्यात. त्यादृष्टीनं अतुल यांनी बी.कॉम. केलं आणि पप्पू यांनी बी.ए.चं शिक्षण घेऊन एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी व्हायचं ठरवलं. दरम्यानच्या काळात दोन्ही बहिणींचं लग्न झालं आणि परिस्थिती थोडी हालाखीची झाली. ती सावरण्यासाठी अतुल आणि पप्पू यांनी शिक्षण थांबवून नोकरी करायचा निर्णय घेतला. अतुल यांनी त्यांचे काका राजाराम पतंगे यांच्या भिगवण इथल्या खानावळीत व त्यांचे मामा जय मल्हार हॉटेलचे मालक मारुती कांबळे यांच्याकडे काम करायला सुरुवात केली, तर पप्पू यांनी रिलायन्स कंपनीत नोकरी धरली. पण दोघांच्या पगारातही भागत नसल्यानं त्यांनी बारामतीतल्या टीसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मच्छी डबा सुरू करायचं ठरवलं आणि तिथंच पहिल्यांदा राऊत (कोळी) कुटुंबाच्या विशेष चवीची ओळख झाली. ही चव विद्यार्थ्यांमध्येच नाही, तर अन्य ग्राहकांमध्येही लोकप्रिय होऊ लागली.
आपण केलेली मच्छी लोकांना आवडतेय हे पाहून अतुल आणि पप्पू राऊत (कोळी) यांनी एक छोटं धाडस करून पाहायचं ठरवलं. त्यांनी एक गाळा भाड्यानं घेतला. 10 जानेवारी 2012 रोजी बारामती-इंदापूर रस्त्यावर मोतीबाग परिसरात आशीर्वाद मच्छी ढाबा सुरू केला. या जागेत एकावेळी कशीबशी 8 माणसं बसायची. पण आशीर्वाद मच्छीची इतकी मोहिनी ग्राहकांवर पडली की अवघ्या सहा महिन्यातच त्यांना शेजारचा गाळाही भाड्यानं घ्यावा लागला. खवय्ये आशीर्वादची मच्छी खायला गर्दी करू लागले. ग्राहकांच्या या विश्वासावरच त्यांनी एक मोठं धाडस करायचं ठरवलं ते म्हणजे, एकाच वेळी 350 लोक बसू शकतील इतकं प्रशस्त हॉटेल सुरू करण्याचं. 2016 मध्ये बारामतीत स्वतंत्र आणि प्रशस्त जागेत आशीर्वाद मच्छी ढाबा सुरू झाला. त्यालाही ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
पवार कुटुंबाच्या सेवेत, आशीर्वाद तत्त्पर!
बारामतीत पवार कुटुंबाचं वर्चस्व किती आहे हे वेगळं सांगायला नकोच. अशा या पवार कुटुंबात मात्र आशीर्वादच्या मच्छीनं वर्चस्व निर्माण केलं आहे. गेल्या पाच वर्षांपासून दिवाळीच्या जेवणाला आवर्जून आशीर्वादची मच्छी दिली जातेय. पाहुण्यांसाठी खास मेजवानीतही आशीर्वादच्या मच्छीला पवार कुटुंबीय पसंती देत आहेत, असं अतुल राऊत (कोळी) यांनी सांगितलं.
घरगुती चव जपल्यानंच प्रतिसाद
आशीर्वादच्या मच्छीला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असला तरीही घरगुती चव राऊत (कोळी) कुटुंबानं जपली आहे. त्यांची आई बायडाबाई या स्वतः माळकरी; पण उत्तम मच्छी बनवतात. विशेष म्हणजे ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेली ही चव या माऊलीनं एकदाही चाखली नाही. या कामात त्यांना त्यांचे पती चंद्रकांत राऊत तसेच सुना माधुरी अतुल राऊत व तृप्ती पप्पू राऊत यांचीदेखील तेवढीच मोलाची साथ आहे.
आशीर्वाद मच्छी ढाबा आता मसाल्यांच्या उत्पादनातही!
आशीर्वादमध्ये मिळणाऱ्या पदार्थांची चव आहे ती त्यांनी बनवलेल्या मसाल्यांमध्ये. हा मसाला आम्हालाही मिळेल का, अशी ग्राहकांची सातत्यानं विचारणा होत होती. त्यामुळंच या मसाल्यांचं उत्पादन सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. घरगुती पद्धतीच्या या मसाल्यांचं उत्पादन येत्या वर्षात आम्ही सुरू करणार असल्याचं अतुल राऊत (कोळी) यांनी सांगितलं.
आशीर्वाद मच्छी आता ऑनलाइन!
वाढती मागणी लक्षात घेता, आशीर्वादनं स्वतंत्र पार्सल सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी आशीर्वाद मच्छी ऍप सुरू करण्यात आले असून त्यावर होम डिलिव्हरीची सोयही उपलब्ध करण्यात आली आहे. ग्राहकांना चांगली सेवा मिळावी, यासाठी होम डिलिव्हरीची स्वतंत्र यंत्रणा त्यांनी विकसित केली आहे, हे विशेष!
…आणि आशीर्वाद खरा ठरला!
आशीर्वाद मच्छी ढाब्याच्या सी-फूड शाखेचं उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आणि शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा व उद्योजिका शर्मिला वहिनी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी शर्मिला वहिनी म्हणाल्या होत्या, माझा पाय तुमच्या हॉटेलला लागला म्हणजे तुमच्या हॉटेलला लक्ष्मीचं पाऊल लागलं असं समजा… त्यांचा हा आशीर्वाद ग्राहकांच्या पाठबळामुळं खरा ठरत असल्याचं अतुल राऊत (कोळी) सांगतात.
हॉटेल व्यवसायात मराठी माणूस झळकावा, हे स्वप्न!
ग्राहकांच्या पाठबळामुळं सुरू केलेल्या या व्यवसायाला इतका प्रतिसाद ग्राहक देतील. आमच्या चवीला इतकं डोक्यावर घेतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. ग्राहकांच्या पाठिंब्यामुळंच आम्ही हॉटेल व्यवसायात चांगली कामगिरी करू शकलो आहे. या व्यवसायात मराठी माणूस झळकावा, हे स्वप्न आम्ही आता बाळगलं आहे. ग्राहकांनी आम्हाला स्वप्न बघण्याची ताकद दिली, त्याबद्दल त्यांचे आभार!
– अतुल आणि पप्पू राऊत (कोळी)
आशीर्वाद महाराष्ट्राचा ब्रॅण्ड व्हावा -अजितदादा पवार
माझ्या गावातली मुलं एवढा चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करत आहेत, याचा मला अभिमान आहे. बारामतीत तयार झालेली ही चव महाराष्ट्रभरात पोहोचावी आणि आशीर्वादहा महाराष्ट्राचा एक ब्रॅण्ड व्हावा अशी माझी इच्छा आहे.
– अजितदादा पवार
…आणि बोर्डावर आईचं नाव झळकलं!
अजितदादा पवार आशीर्वाद सी-फूडच्या उद्घाटनाला आले असता त्यांनी आईच्या नावाचा समावेश हॉटेलच्या बोर्डावर करण्याची सूचना केली. आशीर्वादची चव लोकप्रिय होण्यात अतुल आणि पप्पू राऊत (कोळी) यांच्या आई-बायडाबाई यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळंच त्यांचं नाव पाटीवर देऊन त्यांच सन्मान व्हावा, अशी अजितदादांची इच्छा होती. ती सूचना मान्य करत आज मोठ्या दिमाखात बायडाबाई हे नाव आशीर्वादबरोबर झळकत आहे.
– अतुल राऊत (कोळी)
आशीर्वाद कब्बडी संघ
कब्बडीची प्रचंड आवड असल्यामुळं आशीर्वाद नावानं आम्ही कब्बडीचा संघ सुरू केला आहे. बारामतीतल्या कब्बडी खेळाडूंना वाव मिळावा यासाठी आम्ही हा संघ सुरू केला. या संघाचा सगळा खर्च आशीर्वादच्या माध्यमातून होत आहे. राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धांमध्ये हे खेळाडू चमकत आहेत. अमरावतीमध्ये नुकत्याच झालेल्या स्पर्धेत आमच्या संघाला पहिलं बक्षीस मिळालं आहे.
– पप्पू राऊत (कोळी)
आशीर्वाद टीम
आशिर्वादने ग्राहकांना जसे जपले तसेच कर्मचार्यांनाही जपले आहे. आज त्यांच्याकडे 150 कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचार्यांशी राऊत (कोळी) कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत.





