Scotland vs Australia 2nd T20I Highlights : जोश इंग्लिशची झंझावाती खेळी आणि त्यानंतर मार्कस स्टॉइनिसनं केलेल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात स्कॉटलँडचा 70 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह कांगारू संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियानं संघाने स्कॉटलँडला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र स्कॉलँडचा डाव 126 धावांवरच आटोपला. स्कॉटलँडला 20 षटकेही नीट खेळता आलं नाही. ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडला 16.4 षटकांमध्येच गुंडाळत सामन्यासह मालिकाही खिशात घातली. स्कॉटलँडकडून ब्रँडन मॅकमुलेन याने सर्वाधिक 59 धावा केल्या. तर इतर एकालाही ब्रँडन मॅकमुलेनला साथ देता आली नाही. त्यांच्याशिवाय जॉर्ज मुंसेने 19, मायकेल जोन्सने 01, कॅप्टन रिची बेरिंग्टनने 05, चार्ली टीअरने 05, मायकेल लीस्कने 07, मार्क वॉटने 04, ख्रिस ग्रीव्हजने 06 आणि ब्रॅड व्हीलने 5 धावा केल्या. ख्रिस्तोफर सॉले याला खातेही उघडता आले नाही. ब्रॅडली करी 1 धावा करून नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीबदल बोलायचे झाले तर मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. कॅमेरून ग्रीनने 2 बळी घेतले. त्यांच्याशिवाय झेवियर बार्टलेट, ॲरॉन हार्डी, शॉन ॲबॉट आणि ॲडम झाम्पाने प्रत्येकी 1 बळी घेतला.
We’re all out for 126, as Australia win by 70 runs.#FollowScotland | #SCOvAUS pic.twitter.com/a1EHgwvzmC
— Cricket Scotland (@CricketScotland) September 6, 2024
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँड विरुद्ध ग्रँज क्रिकेट क्लब, मेड येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात जोश इंग्लिसच्या झंझावाती शतकाच्या जोरावर 20 षटकात 4 गडी गमावून 196 धावा केल्या होत्या. स्कॉटलंडचा कर्णधार रिची बेरिंग्टनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्या सामन्यात 80 धावांची वादळी खेळी करणारा ट्रॅव्हिस हेड खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला होता. तर दुसरा सलामीवीर फलंदाज जॅक फ्रेझरही अपयशी ठरला आणि 16 धावा करून बाद झाला. हे दोन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जोश इंग्लिसने स्कॉटलंडविरुद्ध तुफानी खेळी केली.
ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 49 चेंडूंत 7 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 103 धावांची शतकी खेळी केली. त्याने 43 चेंडूत आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. इंग्लिसशिवाय कॅमेरून ग्रीनने 29 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 36 धावांची खेळी केली. मार्कस स्टॉइनिसने 20 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या. स्कॉटलंड संघाकडून गोलंदाजीत ब्रॅडली करीने सर्वाधिक तीन बळी घेतले. ब्रॅडली करीशिवाय क्रिस्टोफर सोलने एक विकेट घेतली.
इंग्लिस जोशने त्याच्या तूफानी शतकी खेळीच्या जोरावर ॲरॉन फिंचचा एक मोठा विक्रमही मोडीत काढला ज्यामध्ये तो आता टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे. ॲरॉन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल दोघांनीही टी-20 मध्ये 47-47 चेंडूत शतके झळकावली आहेत. एडिनबर्गच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लिशने अवघ्या 43 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद शतक
43 चेंडू : जोश इंग्लिस (2024)
47 चेंडू : आरोन फिंच (2013)
47 चेंडू : जोश इंग्लिस (2023)
47 चेंडू : ग्लेन मॅक्सवेल (2023)
49 चेंडू : ग्लेन मॅक्सवेल (2016)
जोश इंग्लिसचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय मधील दुसरे शतक आहे आणि याआधी त्याने फलंदाज म्हणून खेळताना पहिले शतक झळकावले होते, तर या सामन्यात तो यष्टीरक्षक-फलंदाजाची भूमिका बजावत होता. यासह इंग्लिस आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावण्याचा विक्रम करणारा पहिला ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे.