SCO vs AUS 2nd T20 : जोश इंग्लिसचे विक्रमी शतक, ऑस्ट्रेलियाचा स्कॉटलँडपुढे धावांचा डोंगर….

Scotland vs Australia, 2nd T20 : ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँड विरुद्ध ग्रँज क्रिकेट क्लब, मेड येथे खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील जोश इंग्लिसच्या झंझावाती शतकाच्या जोरावर 20 षटकात 4 गडी गमावून 196 धावा केल्या. त्यामुळे स्कॉटलंड संघाला विजयासाठी 197 धावाचं आव्हान मिळाले आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा सात गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे.
स्कॉटलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात स्कॉटलंडचा कर्णधार रिची बेरिंग्टनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्या सामन्यात 80 धावांची वादळी खेळी करणारा ट्रॅव्हिस हेड खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. तर दुसरा सलामीवीर फलंदाज जॅक फ्रेझरही अपयशी ठरला आणि 16 धावा करून बाद झाला. हे दोन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जोश इंग्लिसने स्कॉटलंडविरुद्ध तुफानी खेळी केली.
Australia finish their innings on 1️⃣9️⃣6️⃣-4️⃣
Josh Inglis with a special innings of 103 for the Aussies 👏#FollowScotland | #SCOvAUS pic.twitter.com/hF2t9c9CvL
— Cricket Scotland (@CricketScotland) September 6, 2024
ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 49 चेंडूंत 7 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 103 धावांची शतकी खेळी केली. त्याने 43 चेंडूत आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. इंग्लिसशिवाय कॅमेरून ग्रीनने 29 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 36 धावांची खेळी केली. मार्कस स्टॉइनिसने 20 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या.
इंग्लिस जोशने त्याच्या तूफानी शतकी खेळीच्या जोरावर ॲरॉन फिंचचा एक मोठा विक्रमही मोडीत काढला ज्यामध्ये तो आता टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे. ॲरॉन फिंच आणि ग्लेन दोघांनीही टी-20 मध्ये 47-47 चेंडूत शतके झळकावली आहेत. एडिनबर्गच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लिशने अवघ्या 43 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
जोश इंग्लिसचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय मधील दुसरे शतक आहे आणि याआधी त्याने फलंदाज म्हणून खेळताना पहिले शतक झळकावले होते, तर या सामन्यात तो यष्टीरक्षक-फलंदाजाची भूमिका बजावत होता. यासह इंग्लिस आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावण्याचा विक्रम करणारा पहिला ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. स्कॉटलंड संघाकडून ब्रॅडली करीने सर्वाधिक तीन बळी घेतले. ब्रॅडली करीशिवाय क्रिस्टोफर सोलने एक विकेट घेतली.
टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद शतक
43 चेंडू : जोश इंग्लिस (2024)
47 चेंडू : आरोन फिंच (2013)
47 चेंडू : जोश इंग्लिस (2023)
47 चेंडू : ग्लेन मॅक्सवेल (2023)
49 चेंडू : ग्लेन मॅक्सवेल (2016)





