#INDvAUS 2nd T20 : मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला विजय आवश्यक

नागपूर – रोहित शर्मा आणि कंपनीला तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी आज (शुक्रवार) ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा सामना जिंकणे क्रमप्राप्त बनले आहे. पहिल्या सामन्यात द्विशतकी धावसंख्येचा बचाव करता आला नाही व त्यामुळे पराभव पत्करावा लागलेला भारतीय संघ प्रतिष्ठा जपणार का हाच प्रश्न निर्माण झाला आहे.
आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेपासून सुरू असलेली दिशाहीन गोलंदाजी या सामन्यात ट्रॅकवर आली तरच भारतीय संघ हा सामना जिंकू शकतो. भारतीय संघाची फलंदाजी खोलवर आहे, असे सातत्याने बोलले जाते, पण प्रत्यक्ष मैदानावर यशस्वी झालेले दिसत नाही.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (आज दुसरा टी-20 सामना)
वेळ – संध्याकाळी 7 पासून
ठिकाण – नागपूर
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस
आशिया स्पर्धेत अपयशाचा धनी बनलेला सलामीवीर लोकेश राहुल या मालिकेतील पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करण्यात यशस्वी ठरला. मात्र, कर्णधार रोहित शर्माच्या सातत्याने येत असलेल्या अपयशाचे काय, हा प्रश्न कायम राहिला आहे. त्याच्या जोडीला मुख्य फलंदाज विराट कोहली आशिया स्पर्धेत शतकी खेळी करत भरात आल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, ऑस्ट्रेलिया विरुद्ध तो साफ अपयशी ठरला. सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या यांच्यावरच खरेतर भारताची फलंदाजी अवलंबून आहे.
गोलंदाजीबाबत काय बोलावे हा प्रश्नच आहे. सर्वात अनुभवी असलेला भुवनेश्वर कुमार अत्यंत सुमार कामगिरी करत आहे. मग नवोदित हर्षल पटेलकडून काय अपेक्षा करणार. फिरकीची मदार यजुवेंद्र चहल व अक्सर पटेल यांच्यावर असून चहलला पहिल्या सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. तसेच भारतीय संघाला 8 ते 14 या षटकांत धावांचा वेग वाढवण्यातही कायम अपयश येत आहे, त्यावर तोडगा शोधला गेला पाहिजे. तसेच गोलंदाजी करताना पॉवर प्लेची सहा षटके व अखेरची चार षटके अत्यंत खराब कामगिरी होत आहे त्यातही सुधारणेची गरज आहे.
ऑस्ट्रेलियाबाबत बोलायचे तर कर्णधार ऍरन फिंचने आऊट ऑफ सिलॅबससारखा कॅमेरून ग्रीनला फलंदाजीत बढती देत भारताच्या योजना कुचकामी ठरवल्या. तो स्वतः तर भरात आहेच, पण मॅथ्यु वेड, जोस इंग्लिस, टीम डेव्हीड व सर्वात धोकादायक ग्लेन मॅक्सवेल अशी तगडी फलंदाजी त्यांच्याकडे आहे. गोलंदाजी पूर्वीसारखी सशक्त नसली तरीही उपयुक्त निश्चितच आहे. त्यामुळे आजच्या सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी ते सज्ज असतील, तर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारतीय संघाला फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व या चारही विभागात गांभीर्याने कामगिरी करणे गरजेचे आहे.
बुमराह खेळणार का ?
भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळणार का हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. त्याला दुखापतीमुळे आशिया करंडक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. मात्र, त्यानंतर तो तंदुरुस्त असल्याचे समोर आल्यानंतर त्याची या मालिकेसाठी संघात निवड झाली. मात्र, त्याला पहिल्या सामन्यात का खेळवले गेले नाही हे एक कोडेच ठरले. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर आता या सामन्यात तरी त्याला खेळवणार का, याकडे लक्ष लागले आहे. त्याने संघाच्या सराव सत्रात टिच्चून गोलंदाजी केल्याने त्याचा समावेश केला जाईल, असे सांगितले जात आहे.





