‘एससीओ’ हे समृद्धी-विकासाचे व्यासपीठ

नवी दिल्ली – शांघाय सहकार्य संघटना गेल्या 20 वर्षात युरोशियातील शांतता, समृद्धी आणि विकासाचे व्यासपीठ ठरले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ही संघटना म्हणजे भारताचे विस्तारित कुटुंब असल्याचे भारत मानत असल्याचेही ते म्हणाले.
शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत आभासी माध्यमातून ते बोलत होते. यंग सायंटिस्ट कॉन्क्लेव्ह, ऑथर्स कॉन्क्लेव्ह, स्टार्टअप फोरम आणि युथ कौन्सिल यासारखी नवीन व्यासपीठे “एससीओ’ मधील सदस्य देशांमधील युवकांसाठी पुढे आली आहेत. भारताचे हजारो वर्षे जुने सांस्कृतिक आणि या प्रदेशाशी असलेले लोक-जनतेचे नाते आपल्या सामायिक वारशाची जिवंत साक्ष आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या “एससीओ’च्या बैठकीला रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाझ शरीफ, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी, बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर ल्युकाशेंको, कझाखस्तानचे अध्यक्ष कासिम जोरमात तोकायेव आणि “एससीओ’च्या सदस्य देशांचे अन्य नेते आभासी माध्यमातून सहभागी झाले होते.
सुरक्षा, आर्थिक विकास, कनेक्टिव्हिटी, एकता, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर आणि पर्यावरण संरक्षण हे “एससीओ’ साठी भारताच्या दृष्टीचे आधारस्तंभ आहेत. स्टार्टअप आणि नाविन्य, पारंपारिक औषधे, युवकांचे सक्षमीकरण, डिजीटल सर्वसमावेशकता आणि बौद्ध परंपरेचा स्वीकार यांना भारताचे महत्व असेल, असे मोदी म्हणाले.
अफगाणिस्तानच्या मदतीसाठी शरीफ यांचे साकडे
अफगाणिस्तानला अर्थपूर्ण मदत करण्याचे आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांनी आपल्या भाषणामध्ये केले. अफगाणिस्तानबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाची भूमिका तटस्थतेची असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी केला जाणार नाही, याची तालिबानने काळजी घ्यायला हवी, असेही ते म्हणाले. तर प्रादेशिक शांतता आणि समायिक सुरक्षा सुनिश्चित करावी, असे आवाहन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी यावेळी केले. वर्चस्ववाद आणि सत्तेचे राजकारणाला विरोध करताना आणि जागतिक प्रसासनाची व्यवस्था निर्माण करण्याला प्रादान्य द्यावे, असे आवाहन देखील त्यांनी “एससीओ’च्या सदस्य देशांना केले.
काही देश सीमेपलिकडील दहशतवादाचा वापर आपल्या धोरणाचा भाग म्हणून करतात. अशा देशांचा निषेध करण्यास शांघाय सहकार्य संघटनेने मागे पुढे बघता कामा नये. दहशतवाद हा प्रादेशिक तसेच जागतिक शांततेला धोका ठरतो आहे. आता दहशतवादाबरोबर निर्णायक लढाई करण्याची वेळ आली आहे. कोणत्याही स्वरुपातील तसेच कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा आपण सर्वांनी मिळून सर्व शक्तीनिशी मुकाबला केला पाहिजे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान




